अवाजवी बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:46 PM2017-07-18T23:46:15+5:302017-07-18T23:46:15+5:30

बिलांची रक्कम न भरण्याचा निर्धार : खापर परिसरात घरगुती ग्राहकांना १५ हजारांपर्यंत वीज बिले

Clutter with customers due to unrealistic bills | अवाजवी बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप

अवाजवी बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्राहकांना वीज वितरण कंपनीतर्फे अवाजवी वीज बिले देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बिलांची रक्कम कमी केल्याशिवाय वीज बिले न भरण्याचा निर्धार ग्राहकांनी केला.
खापर व परिसरात घरगुती वीज ग्राहकांना या महिन्यात आठ हजारांपासून ते १५ हजारांपर्यंत वीज बिले देण्यात आल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. काही ग्राहकांनी वीज बिले न भरण्याचे बोलून दाखविले.  गेल्या आठ महिन्यांपासून ग्राहकांना देण्यात येणारी वीज बिले ही अंदाजे स्वरूपात देण्यात येत होती. संबंधित एजन्सी वीज मीटरची रीडिंग न घेताच मनात येईल त्यानुसार अ‍ॅव्हरेज बिल देत होती. याबाबत ग्राहकांनी अनेकवेळा संबंधित अधिकाºयांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र वेळीच दखल घेतली गेली नसल्याने ग्राहकांना तब्बल आठ महिने देण्यात आलेली वीज बिले व मीटर रीडिंगचा ताळमेळ बसत नसल्याने ग्राहकही काही करू शकत नव्हते. आता मात्र दुसरी एजन्सी नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, त्या एजन्सीने घेतलेल्या रीडिंगप्रमाणे आकारण्यात आलेले वीज बिल व प्रत्यक्ष रीडिंग यात तफावत आढळून आल्याने आता उपलब्ध झालेल्या रीडिंगनुसारच पाच ते १५ हजारांपर्यंत रकमेची वीज बिले देण्यात आल्याने ग्राहक बुचकळ्यात पडले आहेत. एवढे वीज बिल भरणे ग्राहकांना अशक्यप्राय झाले असून, वीज ग्राहकांनी वीज बिले न भरण्याचा निर्धार केल्याने वीज बिले थकीत होण्याची शक्यता वाढली आहे.
वीज ग्राहकांना वीज बिले वेळेत न मिळणे ही नेहमीचीच तक्रार आहे. चालू महिन्यापासून १० तारखेपर्यंत वीज बिल भरणा करण्याची मुदत असताना बिले ११ तारखेला देण्यात आली. त्यामुळे तो भुर्दंडही ग्राहकांना सोसावा लागणार आहे. तर जून महिन्यात दोन महिन्यांची वीज बिले ग्राहकांना एकत्रित भरावी लागली होती. याविषयी विचारणा केली असता मे महिन्यातील वीज बिले संबंधितांना मेहनताना न मिळाल्यामुळे वाटपच करण्यात आलेली नव्हती. अशा एक ना असंख्य अडचणी वीज ग्राहकांना येथे सहन कराव्या लागत असून, संबंधित वीज बिले कमी करून मिळावी, अन्यथा वीज बिले न भरण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

संबंधित एजन्सीने मीटर रीडिंग वेळोवेळी घेतले नसल्यामुळे व एजन्सीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे नवीन एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून, तक्रारी आलेल्या ग्राहकांची वीज बिले कमी करून देण्यात येत आहेत.
डी.जे. परदेशी, अभियंता, वीज वितरण कंपनी, खापर

Web Title: Clutter with customers due to unrealistic bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.