Vidhan sabha 2019: युतीत गर्दी तर आघाडीत संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:31 PM2019-09-22T12:31:52+5:302019-09-22T12:49:48+5:30
विधानसभेचे रणांगण : जयकुमार रावल, अमरिशभाई, कदमबांडे, कुणाल पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला
राजेंद्र शर्मा ।
धुळे : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही धुळे ग्रामीण, साक्री आणि शिरपूर या परंपरागत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवित आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले होते. परंतू यंदा परिस्थिती विपरीत झाली आहे. जिल्ह्यातील ‘अँकर’ गटाचे सर्वेसर्वा माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासह दोन्ही विद्यमान आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे काँग्रेसच्या या परंपरागत शिरपूर आणि साक्री विधानसभा मतदारसंघातच आज संभ्रमाची स्थिती आहे. याशिवाय धुळे शहरातील राष्टÑवादीचे सर्वेसर्वा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचेही नाव चर्चेत असल्याने राष्टÑवादी पक्षाचीही तिच परिस्थिती आहे.
पक्षांतराबाबत अमरिशभाई यांच्यासह सर्वच लोकांनी नकार दिला असला तरी हा प्रवेश निश्चित असल्याची चर्चा आजही जिल्ह्यात सुरुच आहे.
दुसरीकडे भाजप - सेना युतीला सुगीचे दिवस आले आहे. जिल्ह्यात धुळे शहर, धुळे ग्रामीणसह सर्वच पाचही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. हे सर्वच उमेदवार मातब्बर असल्याने कोणाला युतीकडून उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिंदखेडा मतदार संघात भाजपतर्फे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यंदा विजयाची ‘हॅटट्रीक’ पूर्ण करण्यासाठी उभे आहेत. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीत ही जागा कोणाला मिळणार हेच स्पष्ट नाही.
येथून काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, राष्टÑवादीतर्फे संदीप बेडसे, ज्ञानेश्वर भामरे यांच्या नावाची चर्चा आहे.
धुळे शहरात भाजप- सेना युतीकडे इच्छुकांची गर्दी आहे. त्यात भाजपतर्फे महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, डॉ.माधुरी बोरसे (बाफना), हर्षल विभांडीक, रवी बेलपाठक, विनोद मोराणकर तर शिवसेनेतर्फे प्रा.शरद पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, सतीश महाले, डॉ.सुशील महाजन यांच्या नावाची चर्चा आहे.
साक्री व शिरपूर मतदारसंघातही भाजप - सेना युतीकडे इच्छुकांची गर्दी जास्त आहे. तर आघाडीत मात्र उमेदवाराच्या नावासंदर्भात आजही अनिश्चितता आहे.
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे धुळे व नंदुरबारकडे लक्ष
नंदुरबारचे पालकमंत्री आणि धुळे जिल्ह्यातील भाजपचे नेते पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना आपल्या मतदारसंघासोबतच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघातही लक्ष द्यावे लागणार आहे. आपल्या शिंदखेडा मतदारसंघात त्यांनी पाच वर्षात दोंडाईचा नगरपालिका आणि शिंदखेडा नगरपंचायतमध्ये सत्ता मिळविली आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि राष्टÑवादीचे आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकूणच या मतदारसंघात रावल यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राष्टÑवादी व शिवसेनेचा भोपळा फुटणार?
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व राष्टÑवादीला पाचपैकी एकही जागा मिळाली नव्हती. यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचा भोपळा फुटणार कि नाही, यावर चर्चा सुरु आहे.
अमरिशभाई व कदमबांडे
जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला लढविणारे माजी मंत्री अमरिशभाई पटेल आणि त्यांचे कट्टर समर्थक राष्टÑवादीचे राजवर्धन कदमबांडे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या त्यांच्या समर्थकांना अस्वस्थ करणारी आहे. या दोघांच्या भाजप प्रवेशाच्या अनिश्चिततेमुळे आघाडीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आघाडीचे नेतृत्व आता कोण करणार पासून चर्चा सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी भाजप प्रवेशाबाबत नकार दिला आहे. तरीसुद्धा आघाडीत निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीण मतदारसंघ वगळता अन्य चारही मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराच्या नावाबाबतची अनिश्चितता कायम आहे. एकूणच हा प्रवेश झाला तर आघाडीला चारही मतदारसंघात नवीन उमेदवार शोधावे लागणार आहे.
माजी आमदार अनिल गोटे
महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी अद्याप विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नशिबी अन् कमनशिबी
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे सर्वात जास्त तीन वेळा उमेदवारी करणारे माजी जिल्हा प्रमुख बापू शार्दुल हे १९९० साली केवळ १ हजार ५६ मतांनी पराभूत झाले. तर साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे माजी मंत्री गो.शि. चौधरी हे १९९० साली केवळ १०२ मतांनी निवडून आले होते.
‘एमआयएम’चे काय
महापालिका निवडणुकीत ७४ पैकी चार नगरसेवक निवडून आल्यामुळे एमआयएमचा धुळे शहरासह जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. यंदा एमआयएमतर्फे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहे.
मनसे पुन्हा मैदानात
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या सचिव प्राची कुलकर्णी यांची उमेदवारी निश्चित असून त्यांना राजगडवरुन तयारीला लागण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. त्या प्रथमच निवडणूक लढवित असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.
प्रथमच नशीब आजमावणार
राम मनोहर भदाणे (भाजप शक्यता)
अनूप अग्रवाल (भाजप शक्यता)
हर्षल विभांडीक (भाजप शक्यता) ४डॉ.माधुरी बाफना (भाजप शक्यता) ४रवी बेलपाठक (भाजप शक्यता) ४प्राची कुळकर्णी (मनसे)