जवान चंदु चव्हाण विरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 08:38 PM2019-04-28T20:38:11+5:302019-04-28T20:38:53+5:30
लोकसभा निवडणूक : फेसबुकवर आवाहन
धुळे : फेसबुकच्या माध्यमातून डॉ़ सुभाष भामरे यांना मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या भारतीय जवान चंदु चव्हाण यांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला़
आचार संहिता भरारी पथकाचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहायक अभियंता अभिनव सुधीर पवार यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, धुळे तालुक्यातील बोरविहिर येथे राहणारे भारतीय जवान चंदू बाबुलाल चव्हाण ते सुरक्षा विभागात शासकीय नोकरीवर असताना त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष रामराव भामरे (केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री) यांच्या फोटोसोबत स्वत:चा फोटो अपलोड केला आहे़
तर दुसºया पोस्टमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष भामरे यांना मतदान करण्याबाबत आवाहन केले आहे़ त्यात नमूद केले आहे की, मी जाहीर आवाहन करतो की, डॉ़ सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा व देशाच्या विकासाला गती देण्यासाठी मतदान करा, जयहिंद़ असे आवाहन करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे़ याप्रकरणी रविवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास संशयित चंदु बाबुलाल चव्हाण याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़ घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकदेव भोरकडे करीत आहेत़ लोकसभा निवडणुकीमुळे हा विषय चर्चेत आला आहे़