धुळ्यातील आग्रा रोडवर लोटगाडीवाल्यांना हटवित साहित्य जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:11 PM2019-12-12T23:11:22+5:302019-12-12T23:11:55+5:30
महापालिकेची धडक मोहीम : पोलिसांची घेतली मदत, १५ ते २० जणांवर कारवाई, तणावाची परिस्थिती
धुळे : शहरातील आग्रा रोडवर अवैध पार्किंगसह लोटगाडीवाल्यांनी जागा अडवून ठेवली़ परिणामी अपघाताचा धोका वाढला होता़ वारंवार सांगूनही त्याचा उपयोग होत नसल्याने अखेर गुरुवारी सकाळी विशेष मोहीम राबविण्यात आली़ पाचकंदिल चौक ते महात्मा गांधी पुतळापर्यंत रस्त्याच्या मधोमध असलेल्या १५ ते २० लोटगाड्यांवर कारवाई करण्यात आली़ महापालिका आणि पोलीस या दोन विभागाने ही मोहीम राबविली़
वाहतुकीच्या कोंडीसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त मालिका लावली होती़ त्याची दखल घेण्यात आली आहे़ शहरातील आग्रा रोडवर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ते चाळीसगाव रोड क्रॉसिंगवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत सारखीच स्थिती होती़ बिनधास्तपणे लोटगाडी रस्त्याच्या मधोमध लावली जात होती़ पाच कंदिलच्या चौकात तर ही स्थिती दिवसभर कायम असायची़ यापुर्वी महापालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने ही अतिक्रमण हटाव मोहीम या भागात राबविण्यात आली आहे़ पण, तेवढ्यापुरता लोटगाडीवाले बाजूला सरकत होते़ पुढे कारवाई केल्यानंतर मागे पुन्हा परिस्थिती जैसे थेच होत होती़ यावर गुरुवारी पुन्हा लक्ष केंद्रीत करण्यात आले़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, वाहतूक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव आणि अन्य कर्मचाºयांनी गुरुवारी सकाळी अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली़ या मार्गावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही अशी तंबी देत त्यांच्याकडील साहित्य जमा केले़ काही काळ तणाव निर्माण झाला होता़
शहरातील आग्रा रोडसह अन्य ठिकाणी वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले आहेत़ याठिकाणी अवैध पार्किंगसह बिनधास्तपणे लोटगाड्या उभ्या करुन रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला जात होता़ यामुळे अपघाताचा धोका वाढला होता़ ही बाब ‘लोकमत’ने अधोरेखित करीत वृत्त मालिकेच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला़ प्रशासनाने देखील ही बाब गांभिर्याने घेऊन नियोजन आखले़ त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून केली आहे़ आता ही मोहीम टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येणार असून रस्ता मोकळा केला जाणार आहे़ शहरातील आग्रा रोडवर सर्वाधिक वर्दळ असते़ सर्वांचाच वावर याच रस्त्यावर असल्यामुळे पथारीवाले, लोटगाडीवाले या ठिकाणी येऊन आपला व्यवसाय करत असतात़ त्यांनी रस्त्याच्या एका कडेला आपला व्यवसाय करणे अनिवार्य असताना मात्र रस्त्यावरच येऊन पाचकंदिल चौकात व्यवसाय करीत असल्याचे वारंवार समोर येत होते़ प्रशासनाने तडकाफडकी मोहीम राबविली खरी, पण हे काम अव्याहतपणे सुरु राहिले तर त्याचा उपयोग आहे़ नाहीतर काहीही उपयोग नाही़