मदतफेरीत १ लाख ६४ हजाराचा निधी गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:18 PM2019-02-23T12:18:32+5:302019-02-23T12:19:13+5:30
शिरपूर : ३५ विविध संघटनेतर्फे शहिदांना श्रध्दांजली
शिरपूर : शहीदांची जबाबदारी सामाजिक व बुद्धिवादी लोकांची आहे. समाजाची प्रामाणिकपणे काम करणे व देशाप्रती प्रेम बाळगणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी व्यक्त केले. दरम्यान, शहिदांच्या परिवारासाठी मदतफेरी काढून १ लाख ६४ हजार रूपये गोळा करण्यात आलेत़
पुलवामा-जम्मू काश्मीर येथे जैश ए मोहम्मद या आत्मघातकी हल्ल्यात ४४ सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे तसेच शहिदांच्या परिवारासाठी मदतनिधी जमा करण्यासाठी २१ रोजी संध्याकाळी कँडल मार्च व मदतफेरी काढण्यात आली.
शहरातील बसस्थानका समोरील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मुख्य कार्यलयापासून विविध मार्गावरुन कँडल मार्च व शहीद सैनिकांच्या परिवारास मदतफेरी काढण्यात आली. यावेळी कँडल मार्चमध्ये सहभागी लोकांनी या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून सहभाग घेतला होता. मदत फेरीत व्यावसायिकांकडून मदत गोळा करण्यात आली. आर्मी जवान प्रेमचंद भामरे यांच्याकडे ज्योत होती.
यावेळी शहीद स्मारकाजवळ झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी विक्रम बांदल, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक संजय सानप, पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे आदी अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वच संघटनाच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनीही भावना व्यक्त केल्या.
शिरपूर येथील या संघटना व संस्थांचा समावेश
या मदतफेरीमध्ये वकील संघ, डॉक्टर्स क्लब, मेडिकल केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, आर्किटेक्ट व इंजिनियर्स असोसिएशन, कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, पॅथोलॉजी व लॅब संघटना, पत्रकार संघ, व्यापारी असोसिएशन, योग विद्या धाम, किराणा व्यापारी असोसिएशन, तालुका सिड्स पेस्टीसाईड्स फर्टिलायझर डीलर्स असोसिएशन, झूलेलाल सिंधी सेवा मंडल, क्षत्रिय अहिर शिंपी शिक्षण प्रसारक मंडळ, अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था, स्टॅम्प वेंडेर संघटना, बारी समाज पंच मंडळ, नवयुवक मित्र मंडळ, बारी युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र, भारतीय जैन संघटना, स्वाभिमान प्रतिष्टान, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, ब्राह्मण सभा, सीए आणि टॅक्स कन्सल्टंट्स, धनगर महासंघ, अखिल भारतीय गुर्जर परिषद, एस़आऱबी़ इंटरनॅशनल स्कूल दहिवद, ट्रक मालक युनियन, महाराष्ट्र बँक या संघटनांचा समावेश होता.