काळंबा येथे नाताळनिमित्त सामुहिक प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:39 PM2019-12-21T22:39:26+5:302019-12-21T22:39:55+5:30
पिंपळनेर परिसर : भक्तीगितातून परमेश्वराची आराधना
पिंपळनेर : (विशाल गांगुर्डे) साक्री तालुक्यातील काळंबा येथे नाताळ सण या उत्सवात साजरा करण्यात येत असल्याने याठिकाणी आणि ग्रामस्थांनी नाताळ सणाची जय्यत तयारी केलेली आहे. सामुहीक प्रार्थना तसेच भक्तिगीताच्या माध्यमातून परमेश्वराची आराधना होत आहे. नाताळ अर्थात ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्र्रिसमसस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षात त्या वेळेचे पहिले पोप ज्युलियस यांनी २५ डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्र्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. काळंबा व पिंपळनेर येथील चर्च कौन्सिलच्यावतीने हा कार्यक्रम सलग तीन दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात घेण्यात आला़ यावेळी काळंबा येथील महिलांनी नाताळ व ख्र्रिसमसच्या पार्श्वभूमीवर सामुहिक प्रार्थना, उपकार स्तुती गीत गाऊन प्रभू येशूचे स्मरण केले. यावेळी आमदार प्रतिनिधी म्हणून डॉ. तुळशीराम गावित यांनी काळंबा येथे चर्चला भेट देऊन येथील ग्रामस्थांना ख्रिसमस नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पिंपळनेर चर्च कौन्सिलचे अध्यक्ष रेव्ह. शिवाजी राऊत, यांनी यावेळी लूक २-१०-११ या प्रकरणातील वचनांचे वाचन करुन त्याचे निरुपम केले. भिऊ नको देव दूत तुज्या पाठीशी आहे, याचा आनंद येशूची भक्ती करणाऱ्याला आनंद नक्कीच मिळेल, जन्म देणारा व तारणारा तोच प्रभू आहे, म्हणून त्याचे वचन पाळणे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे़ यानंतर रेव्ह. मधुकर देसाई यांनी सर्वांसाठी प्रभूकडे आशीर्वाद मागितले़ या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्यात आले. पिंपळनेर चर्च सेक्रेटरी बापू भवरे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आकर्षण म्हणून अमळनेर येथील पास्टर विसाठ गावित, यांनी त्यांच्या पवित्र शास्त्रातून संदेश दिला़ त्यानंतर स्थानिक मंडळीच्या सहकाºर्याने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रेव्ह. आर. के. कुवर, शिवाजी राऊत, यशवंत नाईक काळंबा, बापू भवरे काळंबा, मधुकर देसाई मांजरी, गाजºया वळवी बसरावळ, जरमा वळवी, जर्मन कुवर यांच्यासह काळंबा पिंपळनेर कौन्सिलचे सदस्य यांनी केले होते. यावेळी शाळकरी मुला मुलींचाही सहभाग होता. साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ख्रिस्ती बांधवांचे संख्या बहुसंख्य असल्याने सलग पाच दिवस मंदिरात जाऊन प्रभू येशूचे आराधना केली जाते़ नाताळ सणानिमित्ताने बांधवांमध्ये आनंदाचे उधान आल्याचे दिसून येत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ हे फुललेली दिसत आहे़ नवेकपडे व मिठाई व इतर वस्तू खरेदीसाठी दिसून येत आहे. एक दुसऱ्यांना भेटून प्रभूची लेकरे म्हणून घरोघरी भक्तीच्या माध्यमातून प्रभू संदेश देत शुभेच्छा देत आहेत. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील बहुतेक गावांमध्ये पिंपळनेर, बसरावळ, मांजरी, वारसा, काळंबा, मदकुपिपाडा, चरणमाळ आदी गावांमध्ये नाताळ ख्र्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.