पाणीपट्टीवाढीसाठी आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे?

By admin | Published: March 2, 2015 01:09 PM2015-03-02T13:09:24+5:302015-03-02T13:09:24+5:30

घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करु असे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी सांगितले.

Commissioner for Water Supply Increase? | पाणीपट्टीवाढीसाठी आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे?

पाणीपट्टीवाढीसाठी आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे?

Next

 धुळे : महानगरपालिकेच्या महासभेत घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 
महानगरपालिकेच्या २0 फेब्रुवारीला झालेल्या महासभेत घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापौर जयश्री अहिरराव व सदस्यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाला प्रखर विरोध केल्याने जनभावना लक्षात घेऊन पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर व्यावसायिक पाणीपट्टीत काही प्रमाणात वाढ करण्यात आली होती. परंतु महासभेपूर्वीच प्रभारी आयुक्त के.व्ही. धनाड यांनी पाणीपट्टीत वाढ होणे गरजेचे असल्याने अपेक्षित वाढ न झाल्यास महासभेच्या ठरावाचे विखंडन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार घरगुती व व्यावसायिक पाणीपट्टीत किमान दोन हजार रुपयांची वाढ करावी, अशी मागणी तीन-चार दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांकडे करणार असून महासभा विखंडनाचा प्रस्तावही सादर करणार असल्याचे धनाड यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. 
महासभेत व्यावसायिक वापरासाठी घेण्यात आलेले अर्धा इंची नळकनेक्शन असल्यास ते बंद करावेत, पाऊण इंची नळकनेक्शनसाठी आकारण्यात येणारी वार्षिक पाणीपट्टी ७ हजार ५३६ वरून १२ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ इंची नळकनेक्शनसाठी आकारण्यात येणारी पाणीपट्टी १६ हजार ५५२ वरून २५ हजार करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. महासभेत पाणीपुरवठय़ाच्या संवेदनशील विषयावर बोलताना महापौर जयश्री अहिरराव यांनी, शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांतर्गत प्रत्येक नळावर मीटर बसविण्यात येत असून त्यानंतर मीटरप्रमाणे घरगुती नळधारकांना बिल आकारण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. परंतु आयुक्त के.व्ही. धनाड यांनी कर्मचार्‍यांसह प्रत्येकाचीच अपेक्षा महानगरपालिकेकडून विकासकामे, थकबाकीची आहे. प्रभारी आयुक्त या नात्याने प्रत्येकाला तोंड द्यावे लागत असल्याने उत्पन्नवाढ गरजेचीच आहे. त्यामुळे महासभेचा ठराव विखंडित करून पाणीपट्टीत योग्य ती वाढ करवून घेणार असल्याचे प्र. आयुक्त धनाड म्हणाले. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसात मुख्यमंत्र्यांसह सचिवांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असून मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असे प्र. आयुक्त धनाड यांनी स्पष्ट केले व सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. शहरात घरगुती पाणीपट्टी वर्षाला केवळ १२00 रुपये आकारली जाते. राज्यात कोठेही इतकी कमी पाणीपट्टी आकारली जात नाही. ही रक्कम अत्यंत कमी असून नागरिकांनी किमान ४000 रुपये पाणीपट्टी भरल्यास दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी द्यायला तयार असल्याचेही आयुक्त धनाड यांनी स्पष्ट केले.

Web Title: Commissioner for Water Supply Increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.