धुळ्याच्या सीईओंनी भेट नाकारल्याने अनुकंपाधारक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 12:50 PM2020-09-17T12:50:00+5:302020-09-17T12:50:29+5:30
४० अनुकंपाधारकांच्या कागदपत्रांची तपासणी होऊनही सेवेत समावून घेण्यात आलेले नाही
आॅनलाइन लोकमत
धुळे :अनुकंपधारकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत समावून घेण्यासाठी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली, तरीही गेल्या सात महिन्यापासून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेत आपले म्हणणे मांडण्यासाठी आलेल्या ४० अनुकंपधारकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट नाकारल्याने, अनुकंपाधारक संतप्त झाले. मात्र एका राजकीय पदाधिकाऱ्याने त्यांची समजूत काढल्याने, अनुकंपाधारक माघारी फिरले.
जिल्ह्यातील अनुकंपाधारक गेल्या ८- ते १० वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. वित्त विभागाच्या ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध आहे, आणि ज्या पदाच्या भरतीवर निर्बंध नाहीत अशा सरळसेवेच्या कोट्यातील सर्व पदांच्या बाबतीत गट-क व गट-ड मधील प्रतीवर्षी रिक्त होणाºया पदाच्या २० टक्के पदे ही अनुकंपाधारकांना देण्याचे शासनाचे आदेश आहेत. दरम्यान ग्रामविकास विभागाच्या ४ फेब्रुवारी २०२०च्या पत्रानुसार अनुकंपाधारकांना ४५ दिवसाच्या आत नियुक्ती देण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते. मात्र अद्याप काही कार्यवाही झालेली नाही.
राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र दिले आहेत. मात्र धुळे जिल्हा परिषदेने अनुकंपधारकांना अद्याप सेवेत समावून घेतलेले नाही. दरम्यान या अनुकंपधारकांच्या कागदपत्रांची तपासणी तसेच घराची पाहणी फेब्रुवारी महिन्यातच करण्यात आलेली आहे. असे असतांनाही अनुकंपधारकांना सेवेत समावून घेण्यात आलेले नाही.
दरम्यान या संदर्भात जिल्ह्यातील जवळपास २५ ते ३० अनुकंपाधारक आज जिल्हा परिषदेत सकाळी १० वाजताच दाखल झाले. या अनुकंपधारकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांची भेट घेण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. मात्र सीईओंनी त्यांना भेट दिली नाही असे या अनुकंपधारकांचे म्हणणे होते. सीईओंनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी यांना भेटण्यास सांगितले. मात्र ते नसल्याने, अनुकंपधारकांना त्यांची भेट घेता आली नाही.
दरम्यान राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसेल यांनी या अनुकंपधारकांची समजूत काढली. त्यानंतर हे अनुकंपाधारक माघारी फिरले. दरम्यान या अनुकंपधारकांनी प्रशासनाला निवेदन देवून तत्काळ अनुकंपाचे नियुक्ती पत्र देण्याची मागणी केली आहे.