धुळे बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:50 PM2019-03-02T22:50:16+5:302019-03-02T22:50:43+5:30
कृषी विद्यापीठाचा प्रश्न : दुपारनंतर व्यवहार पूर्ववत
धुळे : कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून युवा सेनेने आंदोलन सुरु केलेले आहे़ त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी धुळे बंदची हाक दिली होती़ या बंदला सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र दुपारनंतर व्यवहार पूर्ववत सुरु झाले होते़ अर्थात बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला़
धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी युवक, विद्यार्थी, पालक व धुळेकरांसह वेगवेगळ्या पद्धतीने २००९ पासून आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठाबाबत केलेल्या घोषणेचा निषेध म्हणून २ मार्च रोजी धुळे बंदचे ही आवाहन करण्यात आले होते़ त्यास धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय संघटनांनी पाठींबा दर्शविला़ अनेकांनी दुपारपर्यंत आपले व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवली होती़ सकाळी बाजारपेठेत तसा शुकशुकाट होता़ परंतु दुपारनंतर पुन्हा बाजारपेठ पूर्ववत सुरु झाली़
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठाबाबत केलेल्या घोषणेचा निषेध म्हणून आक्रमक झालेल्या युवा सेनेने धुळे बंदची हाक शनिवारी दिली होती़ या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला़ सकाळी दुकाने बंद असली तरी दुपारुन व्यवहार पूर्ववत सुरु झाले होते़ तसेच कृषी विद्यापीठाला पाठींबा दर्शवत धुळे न्यायालयात देखील वकीलांनी लालफिती लावून कामकाज केले़ यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष मधुकर भिसे, सचिव सुनील बच्छाव, विवेक सुर्यवंशी, श्यामकांत पाटील तसेच प्रा. शरद पाटील, अतुल सोनवणे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अॅड़ पंकज गोरे उपस्थित होते.