मनपा हद्दवाढीतील नऊ गावांतील मालमत्तांचे रेकॉर्ड संगणकीकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:31+5:302021-05-31T04:26:31+5:30
धुळे महापालिकेत तीन वर्षांपूर्वी शहरालगत असलेल्या अकरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांचा विकास व नागरिकांना मालमत्ता कराचा ...
धुळे महापालिकेत तीन वर्षांपूर्वी शहरालगत असलेल्या अकरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांचा विकास व नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता, यासाठी मालमत्तांच्या नोंदीचा सर्व डाटा संगणकीकृत करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेला डाटा संगणकात नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात सुरुवातीलाच सात गावांतील नागरिकांना मालमत्ता कर भरता येणार आहे.
महापालिकेची हद्दवाढ होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला. हद्दवाढीतील गावांमध्ये असलेल्या मालमत्ताचे जीआयएस मॅपिंग करून मोजमाप करण्यासाठी महापालिकेने ठेकेदार नेमला आहे. त्यानुसार आतापर्यंत सात गावांमधील मालमत्तांच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजमाप झालेल्या मालमत्ताधारकांना कर निर्धारणासाठी नोटीस पाठविण्यात येणार आहे.
जागांना दिले विशिष्ट क्रमांक
हद्दवाढीतील सात गावांचे मोजमाप पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे मालमत्तांना नंबरही दिले आहे. बखळ जागेलाही नंबर देण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यात बांधकाम झाल्यावरही हा क्रमांक कायम राहील. मोजमाप झालेल्या मालमत्ताधारकांना कर निर्धारणासाठी नोटीस पाठविण्यात येईल. त्यानंतर सुनावणी होऊन अंतिम निर्णय होणार आहे.
शहरालगत असलेल्या गावांचा महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीत आल्यानंतर गावात सोयीसुविधा उपलब्ध हाेतील, अशी अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र, अद्याप नागरिक सुविधांपासून वंचित आहे. हद्दवाढीतील गावात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. महापालिकेच्या हद्दीतील गावात अनेकांनी नवीन बांधकाम केले आहे. त्यामुळे या गावातील मालमत्तांचे मोजमाप करणे आवश्यक होते. मालमत्तांची नाेंदणी व मोजमाप केल्यानंतरच मालमत्ता कराची आकारणी करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने हद्दवाढीतील गावातील मालमत्तांची मोजणी करण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आला. जीआयएस प्रणालीद्वारे मालमत्तांची मोजणी करण्यात आली. तसेच ड्रोनद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मालमत्तांचे सर्वेक्षण, माेजमाप करण्यास सुरुवात झाली. त्यानुसार बखळ जागेचीही नोंद करण्यात आली आहे. महापालिकेच्या हद्दीतील सात गावांत सर्व्हे, मालमत्तेला नंबर देणे, मालमत्ता मोजमाप करण्याचे काम पूर्ण झाले आहे. वलवाडी गावांचे काम प्रगतिपथावर आहे.