पुलांची स्थिती..नजर हटी..दुर्घटना घटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:13 PM2020-10-01T20:13:44+5:302020-10-01T20:14:42+5:30
शिरपूर : शहरालगत असलेल्या नदीवरील पुलाचे कठडे तुटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : शहराजवळील दोन ...
शिरपूर : शहरालगत असलेल्या नदीवरील पुलाचे कठडे तुटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहराजवळील दोन तर राज्य महामार्ग शिरपूर-शहादा महामार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरील कठडे, सुरक्षित गार्ड तुटलेले असल्याने वाहन धारकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़ तसेच ग्रामीण भागातील बहुतांशी लहान पुलांवर कठडेच बसविलेले नसल्याने अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत़
शिरपूर शहरालगत असलेल्या आमोदे गावाकडे जाणारा रस्त्यावरील अरूणावती नदीवर लहान पूल बांधण्यात आला आहे़ जेव्हा-जेव्हा या नदीला महापूर आला, त्या-त्यावेळी या पूलाचे कठडे वाहून गेले आहेत़ गेल्या वर्षी देखील या नदीला महापूर आल्यामुळे कठडे वाहून गेले आहेत़ तेव्हापासून या पूलावर वाहून गेलेले कठडे नव्याने बसविण्यात आलेले नाहीत़ मात्र याच पूलाशेजारी मोठा पूल करण्यात आल्यामुळे त्या पूलावरून देखील अधिक वर्दळ असते़ असे असले तरी या पूलाचे कठडे बसविण्यात यावे अशी मागणी केली जात आहे़ लहान पूलावरून देखील नेहमीच वाहनांची वर्दळ असते़
तसेच शहरातील खंडेराव मंदिराजवळील अरूणावती नदीवर उंटावद गावाकडे जाणारा पूलाचे देखील कठडे महापूरामुळे वाहन गेले आहेत़ गेल्या ९ आॅगस्टला आलेल्या पूरामुळे नेहमीप्रमाणे कठडे वाहून गेले आहेत़ तेव्हापासून या पूलाला पुन्हा कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ याच नदीवर पुन्हा बाळदे गावाजवळ तिसरा पूल बांधण्यात आलेला आहे़ याही पूलाची परिस्थिती तशीच आहे़
गेल्या वर्षी नदी-नाल्यांना आलेल्या महापूरामुळे बहुतांशी ग्रामीण भागातील पुलाचा भराव, पुलाचे कठडे वाहून गेले तर रस्त्यांचे डांबरीकरण उखडून गेल्यामुळे त्या रस्त्यावर ये-जा करणे धोकेदायक ठरू लागले आहे़ शहरातील अरूणावती नदीला आलेल्या महापूरामुळे देखील शिरपूर-उंटावद गावाला जोडणारा पूलाच्या वरपर्यंत पाणी वाहिले होते, त्यामुळे या पुलाचा भराव वाहून गेला होता़ त्यामुळे काही दिवस रहदारीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता़ मात्र नागरिकांचे हाल होवू लागल्यामुळे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी तातडीने तो भराव बुजून टाकल्यामुळे रहदारी पुर्ववत सुरू करण्यात आली होती़