कॉँग्रेस कार्यालयामध्ये अद्याप शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:16 PM2019-09-25T23:16:04+5:302019-09-25T23:16:44+5:30
उमेदवारीबाबत उत्सुकता : कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
धुळे : राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन पाच दिवस उलटले असून कॉँग्रेस पक्षाचे शहरातील कार्यालय असलेल्या कॉँग्रेस भवनात मात्र अद्यापही शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एरव्ही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या गोतावळ्याने कार्यालयासह आवार व समोरील वर्दळीचा रस्त्यावरही गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी होते. मात्र या वेळी कॉँग्रेस भवनासह परिसर सामसूम असल्याचे दिसतो. कार्यकर्त्यांना उमेदवारांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
या निवडणुकीसाठी कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडी झाली असली तरी गेल्यावेळी दोन्ही पक्षांनी ‘स्वबळ’ आजमावले होते. त्यात कॉँग्रेसने धुळे ग्रामीण, साक्री व शिरपूर या तीन जागा पटकावल्या. तर राष्टÑवादी कॉँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. यावेळी मात्र दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. दोघांनी राज्यात किती जागा लढवायच्या हे निश्चित झाले असले तरी जिल्ह्यात कोणती जागा कोणता पक्ष लढविणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र गेल्यावेळी कॉँग्रेसने मिळविलेल्या धुळे ग्रामीण, शिरपूर व साक्री या तिन्ही जागा कॉँग्रेसला तर धुळे शहर व शिंदखेडा या राष्टÑवादीस देण्यात येतील, असे गृहीतक मांडले जात आहे.
दोन्ही पक्षांतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात असून ते जागा व उमेदवारीबाबतच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. पक्षाचे कोणी निरीक्षक आले तरच कॉँग्रेस भवनाचा परिसर गर्दीने फुलून जातो. एरव्ही नेते, पदाधिकारीच नव्हे तर कार्यकर्तेही त्याकडे फिरकत नसल्याचे चित्र दिसते.