काँग्रेसनेच ८० वेळा घटनेत बदल केला: नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 09:30 AM2024-05-18T09:30:10+5:302024-05-18T09:31:19+5:30
गडकरी म्हणाले, काही वर्षांपूर्वी काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला होता; पण, गरिबी हटली नाही, तर काँग्रेसची चापलुसी करणाऱ्यांची गरिबी दूर झाली.
शिंदखेडा (धुळे) : संविधान बदलण्यासाठी भाजप ‘४०० पार’चा नारा देत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून होत आहे; परंतु, देशाचे संविधान कोणीच बदलवू शकत नाही. उलट काँग्रेसनेच राज्यघटनेत तब्बल ८० वेळा बदल केला, अशी टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी शिंदखेड्यात झालेल्या जाहीर सभेत गडकरी बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अभिजित गोपचिडे, आमदार जयकुमार रावल उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, काही वर्षांपूर्वी काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला होता; पण, गरिबी हटली नाही, तर काँग्रेसची चापलुसी करणाऱ्यांची गरिबी दूर झाली.
देशातील विद्यमान सरकार हे शेतकऱ्यांचे कल्याण करणारे आहे. गेल्या १० वर्षांत देशात रस्त्यांचे जाळे विणले गेले. तब्बल ५० लाख कोटींची विकासकामे झाली. काँग्रेसने ६० वर्षांत महाराष्ट्राला केवळ २ लाख कोटी रुपये दिले, तर मोदी सरकारने महाराष्ट्राला १० लाख कोटी रुपये दिले. काँग्रेसला जे ६० वर्षांत जमले नाही, ते आम्ही अवघ्या दहा वर्षांत केले, असा दावाही गडकरी यांनी केला.