धुळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ‘बुस्टर’ डोसची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:51 PM2019-02-28T22:51:37+5:302019-02-28T22:51:59+5:30
धुळे : खासदार शरद पवारांनी दिला होता कानमंत्र
राजेंद्र शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतू भाजपने याला सुरुंग लावून गेल्या दोन पंचवार्षिकपासून धुळे लोकसभेवर आपला कब्जा अबाधित ठेवला आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हा मतदारसंघ काबीज करण्याची संधी आहे. जिल्ह्यात आजही काँग्रेस- राष्टÑवादीची प्रामाणिक आघाडी आहे. जिल्ह्यात जर आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम केले तर आपल्याला सहज यश मिळेल, असा कानमंत्र राष्ट्रवादीचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या आधी आयोजित एका जाहीर कार्यक्रमास दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दिला होता. तरीही नुकत्याच डिसेंबर महिन्यात झालेल्या धुळे महापालिका निवडणुकीत मात्र या आघाडीला पराभव पत्कारावा लागला. राष्टÑवादीला महापालिकेतील आपली १० वर्षापासूनची अबाधित सत्ता गमवावी लागल्याने आघाडीत बिघाडी झाली की काय, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पण आजही काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीची धुळे - नंदुरबार जिल्हा बँक आणि जिल्हा परिषदेत सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीचे जिल्ह्यात आपले वेगळे राजकीय वर्चस्व आहे, हे कोणीही मान्य करणार. आता आघाडीला पुन्हा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आगामी लोकसभा निवडणुकीत मिळाली आहे.
दिग्गज नेत्यांची मांदियाळी : जिल्ह्यात काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीत माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री व आमदार अमरिशभाई पटेल, राष्टÑवादीचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, आमदार कुणाल पाटील, आमदार डि. एस. अहिरे, आमदार काशिराम पावरा यांच्यासह तरुण नेतेमंडळीची साथ आहे. अशा दिग्गज नेत्यांची मांदियाळी आघाडीत आहे. यासर्वांनी एकत्र येऊन एकजुटीचा फायदा आघाडीला मिळणार आहे. एकूणच आगामी लोकसभा निवडणुकीत या सर्व दिग्गजांची शक्तीपणाला लागणार आहे. या सर्व नेतेमंडळीसह संपूर्ण आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांना प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या सभेने काँग्रेस आणि आघाडीला बुस्टर मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आघाडीची सत्ता स्थाने
खासदार - १० वर्षापासून नाही
आमदार - ३
महानगरपालिका - नाही
पंचायत समिती - ३
नगरपालिका - १
नगरपंचायत - १