तत्त्वज्ञान केंद्राचे बांधकाम काढले
By admin | Published: February 28, 2017 11:49 PM2017-02-28T23:49:09+5:302017-02-28T23:49:09+5:30
महसूल विभागाची कारवाई : दोन महिन्यांपूर्वी दिला होता इशारा, रस्त्याचे काम प्रस्तावित
धुळे : शहरातील लहान पुलाजवळील सावरकर पुतळ्यासमोर असलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध तत्त्वज्ञान केंद्राचे बांधकाम मंगळवारी महसूल विभागातर्फे काढण्यात आल़े या वेळी केंद्राचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर उपस्थित होत़े
पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेपाच कि.मी.चे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या रस्त्याला अडथळा ठरत असलेले तत्त्वज्ञान केंद्र स्वत:हून काढून घेण्याची घोषणा केंद्राचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर यांनी केली होती़ त्यानुसार केंद्राचा काही भाग याआधीच हटविण्यात आला होता़ त्यानंतर आमदार अनिल गोटे यांनी वाल्मीक दामोदर यांचा जयहिंद महाविद्यालयासमोर 1 जानेवारीला झालेल्या जाहीर सभेत सत्कार केला होता़ मात्र त्यानंतर दोन महिने उलटूनही तत्त्वज्ञान केंद्राचे उर्वरित बांधकाम काढण्यात आले नव्हत़े
मंगळवारी अपर तहसीलदार ज्योती देवरे या पथकासह सकाळी 11 वाजता तत्त्वज्ञान केंद्रात दाखल झाल्या असता या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येत असल्याचे दिसून आल़े त्यामुळे देवरे यांनी तत्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल़े
त्यानुसार केंद्राचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर यांच्या उपस्थितीतच अतिक्रमण काढण्यात आले.
या केंद्राच्या मागील बाजूस महापालिकेने सार्वजनिक शौचालये उभारली असून तीदेखील हटविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े
त्याबाबत तहसीलदारांनी चार ते पाच वर्षापूर्वीच आदेश दिले होत़े त्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती़ शासकीय जागेवरील संपूर्ण अतिक्रमण काढले जाईल, असे अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केल़े