धुळ्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:56 PM2019-06-21T22:56:35+5:302019-06-21T22:57:16+5:30
२८ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी : विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल
धुळे : इयत्ता अकरावीसाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रवेश अर्ज स्वीकारल्यानंतर विज्ञान शाखेसाठी २७ किंवा २८ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्टÑ राज्य परीक्षा मंडळामध्ये मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर झाला. जिल्ह्यातील २८ हजार ३६ पैकी २१ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ७७.११ टक्के लागला. दरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले होते. गुरूवारी परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळताच, शुक्रवारपासून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे.
घोगरे महाविद्यालय
एस.एस.व्ही.पी.एस. संस्थेच्या डॉ. पी.आर. घोगरे विज्ञान महाविद्यालयात २१ पासून विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज जमा करण्यास सुरूवात झालेली आहे. २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज जमा करण्यात येतील. त्यानंतर २८ रोजी सायंकाळी ४ वाजता पहिली संवर्गनिहाय गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. २९ जून ते २ जुलै दरम्यान पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यानंतर दुसरी, तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर करून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या ४२० जागा आहेत. प्रवेशापासून कोणीही वंचीत राहणार असे प्राचार्य एम.व्ही. पाटील यांनी सांगितले. दरम्यान या महाविद्यालयात कला शाखेच्या ६० व वाणिज्य शाखेच्या १८० जागा असून, त्यांचीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती प्राचार्य एम.पी. पाटील यांनी दिली.
झेड.बी.पाटील महाविद्यालय
येथेही इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या अनुदानित २४०, विना अनुदानितच्या १२० तसेच वाणिज्य शाखेच्या अनुदानित १२० व विना अनुदानितच्या १२० जागा आहेत. तर कला शाखेच्या १२० जागा उपलब्ध आहेत. विज्ञान शाखेसाठी २८ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल, असे महाविद्यालयातून सांगण्यात आले.