वृक्षतोडप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा!
By admin | Published: February 22, 2017 12:11 AM2017-02-22T00:11:26+5:302017-02-22T00:11:26+5:30
वृक्ष समिती सभा : तळफरशीचे काम करणा:या ठेकेदाराचा समावेश, वृक्षतोड केल्यास पाच हजारांचा दंड
धुळे : बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचे समोर आल्याने विविध विकासकामे करीत असलेल्या तीन ठेकेदारांसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला़ नदीपात्रात सुरू असलेल्या तळफरशीच्या कामाच्या ठेकेदाराचाही त्यात समावेश आह़े तर यापुढे बेकायदा वृक्षतोड झाल्याचे समोर आल्यास प्रतिवृक्ष पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आह़े
महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीची 13 जानेवारीला तहकूब झालेली सभा मंगळवारी दुपारी चार वाजता पार पडली़ या सभेला आयुक्त संगीता धायगुडे, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, अभिजित कदम यांच्यासह समितीचे सदस्य मनोज मोरे, इस्माईल पठाण, प्रशांत श्रीखंडे, जुलाहा रश्मीबानो, प्रभावती चौधरी व अधिकारी उपस्थित होत़े सभेच्या विषयपत्रिकेवर तब्बल 31 विषय घेण्यात आले होत़े सभेच्या सुरुवातीस शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी दिलेल्या पत्रावर चर्चा झाली़ पांझरा नदीपात्रात सध्या सुरू असलेल्या तळफरशीच्या कामासाठी तीस ते चाळीस वृक्षांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती़ त्यानुसार समितीत चर्चा होऊन ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला व तसा ठराव मंजूर करण्यात आला़ तसेच सचिन सोनवणे यांच्या तक्रारीवरून पांझरा नदीपात्रात हत्तीडोह परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा विषय चर्चेला आल्यानंतर याप्रकरणी ठेकेदार असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करावा व तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांना नोटीस देऊन खुलासा मागवावा, असे आदेश आयुक्तांनी दिल़े
त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषय चर्चेला आल़े नगरसेविका यमुनाबाई जाधव यांनी अण्णा भाऊ साठेनगरात घरकूल योजनेच्या कामात अडथळा ठरणा:या चार झाडांच्या तोडीसाठी अर्ज दिला होता़ मात्र सदर वृक्षांची तोड झाली असून याठिकाणी इमारत उभारण्यात आल्याचे सदस्यांनी स्पष्ट केल्याने तपासणी करावी व वृक्षतोड झाली असल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश आयुक्तांनी दिल़े त्याचप्रमाणे तक्रारदार शकील शेख व नगरसेविका जुलाहा रश्मीबानो अकील अहमद यांच्या पत्रावरून शहरातील वडजाई रोडलगत सव्र्हे क्रमांक 393/2 बगिचा भूखंडावरील 25 ते 30 निबाची झाडे हमीद हाफिज हाशीम यांनी तोडल्याने त्यांच्यावर कारवाईचा विषय सभेत चर्चेला आला़ सदस्यांच्या चर्चेनंतर आयुक्तांनी प्रतिवृक्ष पाच हजार रुपये दंड आकारणीसह गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल़े नगरसेवक प्रशांत श्रीखंडे यांच्या पत्रावरून मागील सभेत राजवाडे बँकेजवळील संजय मुंदडा यांना बेकायदा वृक्षतोडप्रकरणी तीन हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता, त्यानंतर मुंदडा यांनी दंडाची रक्कम माफ करण्याचे पत्र दिले होत़े मात्र दंड कायम ठेवण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला़ सभेत तीन विषय स्थगित ठेवण्यात येऊन त्यांची अधिक माहिती मागविण्यात आली़ तर उर्वरित अर्जावर विस्तार कमी करण्यास व काही झाडे पूर्ण काढण्यास सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली़
तर ‘कर’ भरा़़़
वृक्ष प्राधिकरण समितीत वृक्षतोड करण्यासाठी अर्ज सादर करणा:या किंवा अन्य कोणत्याही सुविधांसाठी मनपात अर्ज करणा:या अजर्दाराने मालमत्ता कर व पाणीपट्टी भरल्याची पावती सादर केल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेण्यात यावे, अशी मागणी सहायक आयुक्त अभिजित कदम यांनी सभेत केली़ सदर मागणी वृक्ष समितीने मान्य केली़ त्यामुळे अजर्दारांना प्रथम कर भरावे लागणार आहेत़