कोरोनामुळे खेळाडूंच्या कौशल्यावरही परिणाम, उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर दुसऱ्या वर्षीही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:02+5:302021-06-01T04:27:02+5:30

विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर दरवर्षी जिल्हा क्रीडा विभागासह विविध क्रीडा संघटना, अकॅडमी, क्लबच्या माध्यमातून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे होतात. या ...

Corona also affects players' skills, canceling summer sports training camp for second year | कोरोनामुळे खेळाडूंच्या कौशल्यावरही परिणाम, उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर दुसऱ्या वर्षीही रद्द

कोरोनामुळे खेळाडूंच्या कौशल्यावरही परिणाम, उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर दुसऱ्या वर्षीही रद्द

Next

विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर दरवर्षी जिल्हा क्रीडा विभागासह विविध क्रीडा संघटना, अकॅडमी, क्लबच्या माध्यमातून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे होतात. या शिबिरांमध्ये खेळाडूंच्या शारीरिक क्षमता वाढीसह कौशल्यवाढीसाठी प्रयत्न केले जातात. प्रशिक्षण शिबिरांमुळे खेळाडूंची कामगिरी उंचावते. मात्र, कोरोना संकटामुळे गेल्यावर्षी उन्हाळी क्रीडा शिबिरे झाली नाहीत, तसेच वर्षभर क्रीडा स्पर्धाही झाल्या नाहीत. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे यंदाही खेळाडूंना शिबिरांना मुकावे लागले. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमुळे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात खेळाडू अधिकाधिक वेळ देऊ शकतात. त्यामुळे अशा शिबिरांना महत्त्व आहे. जिल्ह्यात विविध खेळांच्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीयस्तरावर ठसा उमटवला आहे. त्यात प्रामुख्याने ॲथलेटिक्स, नेटबॉल, शूटिंगबाॅल, बास्केटबॉल, बाॅक्सिंग, कुस्ती, खो-खो, कबड्डी यासह अनेक खेळांचा समावेश आहे.

जिल्ह्याच्या क्रीडा विभागात खो-खो, कबड्डी आणि क्रिकेट खेळाचे मिळून दोन प्रशिक्षक आहेत. जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत या तीन खेळांसोबतच अनेक खेळांचे दरवर्षी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर होते. मात्र, कोरोनामुळे यंदा या शिबिरावर बंधने आली. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे.

खेळाच्या नियमांची ओळख करून देण्याचे काम शिबिरांतून होते, तसेच वैयक्तिक व शारीरिक मानसिक क्षमता वाढीस लावणे, बौद्धिक क्षमता, एकाग्रता, शिस्त व संघ भावना खेळामुळे वाढीस लागते. शिबिरातून पायाभरणीचे काम होते. खेळाडूंच्या कौशल्य विकासाला खीळ बसली.

-हेमंत भदाणे, क्रीडा शिक्षक

कोरोनामुळे सरावासाठी खेळाडूंना अडचण येते. संचारबंदीमुळे घरीच व्यायाम सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यात प्रशिक्षण शिबिरे होतात. मात्र, कोरोनामुळे मैदाने बंद असल्याने अडचण निर्माण झाली आहे. कौशल्य विकास, आत्मविश्वास वाढीसाठी ही शिबिरे उपयुक्त ठरतात. मात्र, कोरोनाने त्यावर पाणी फेरले. -महेंद्र गावडे, राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू

कोरोनाच्या संसर्गामुळे उन्हाळी क्रीडा शिबिरे होऊ शकली नाहीत. क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांचे ऑनलाइन वेबिनार घेतले आहेत.

कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची आणि शासनाच्या निर्देशांची वाट पाहत आहोत.

-सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे

Web Title: Corona also affects players' skills, canceling summer sports training camp for second year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.