कोरोनाचा धुळे जिल्ह्यात चौथा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 09:01 PM2020-04-23T21:01:14+5:302020-04-23T21:01:50+5:30
धोका वाढला : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १६ झाली
धुळे : येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल गजानन कॉलनीतील दाखल धुळ्यातील लोकप्रतिनिधीचा नातेवाईक ४५ वर्षीय कोरोना बाधीत रूग्णाचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. तर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मयत रुग्णाचा अहवालही पॉझीटीव्ह निघाल्याने शहरात कोरोनाचे चार बळी झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी वैद्यकीय महाविद्यालयातील सात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आता जिल्ह्यातील उपचार घेणारे १२ आणि मयत चार असे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ झाली आहे. त्यामुळे धुळे जिल्हयाचा समावेश रेड झोनमध्ये झाला आहे.
धुळे शहरातील वडजाई रोडवरील गजानन कॉलनी परिसरात राहणाºया धुळ्याचे लोकप्रतिनिधींचे नातेवाईक ४५ वर्षीय व्यक्तीचा २० एप्रिल रोजी कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्याला उपचारासाठी हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्याचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. दुपारी सोशल डिस्टन्सिंग आणि शासकीय नियमांचे पालन करत एका दफनभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला.
दरम्यान धुळे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे मनपाचे माजी नगरसेवकाचे बंधुचा गुरुवारी मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा अहवालही कोरोना पॉझीटीव्ह आला आहे.
तसेच साक्री येथील ५३ वर्षीय व धुळ्यातील मच्छिबाजार परिसरातील ५७ वर्षीय प्रौढाचा मृत्यू यापूर्वीच झाला आहे.
एकाच दिवशी सात पॉझिटिव्ह
जिल्ह्यात एकाच दिवशी सात नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात धुळे शहरातील मच्छीबाजार परिसरातील मयत कोरोना बाधीत रुग्णाच्या कुटुंबातील सहा तर शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता १५ वर पोहचली आहे. दरम्यान आतापर्यंत ४४३ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात ४२८ जण निगेटिव्ह आहेत. ४२ रुग्णांचे अहवाल अद्याप बाकी आहेत.
शिरपूरही तीन दिवस लॉकडाउन
शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. सदर महिलेच्या आईचे एक महिन्यापूर्वीच मुंबईला पायाचे आॅपरेशन झाले होते. त्यानंतर आई - लेकी परत आमोद्याला आल्या. त्यापैकी मुलीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
झोन ठरविण्याचे निकष
ज्याठिकाणी १५ किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत व ज्याठिकाणी संख्या वाढत आहे तो भाग रेडझोन
ज्याठिकाणी १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत व त्यांची संख्या वाढलेली नाही ते भाग आॅरेंज झोन
जेथे गेल्या २८ दिवसात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही व आहे ते रुग्णही पूर्णपणे बरे झाले आहेत तो भाग ग्रीन झोन.
धुळे शहरातील सहा तर शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील महिला असे एकूण सात रुग्ण पॉझिटीव्ह निघाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १५ झाली आहे. त्यामुळे धुळे जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. आताही धुळेकर नागरिकांनी याचे गांभीर्य ओळखावे आणि सोशल डिस्टन्सिंगने घरातच राहून आपला आणि परिवाराचे संरक्षण करुन जिल्हा प्रशासनाला साथ द्यावी, हे कळकळीची विनंती आहे.
- डॉ.दीपक शेजवळ, समन्वयक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे