शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 08:48 AM2020-04-23T08:48:44+5:302020-04-23T08:49:05+5:30
शिरपूरसह आमोदे, मांडळ परिसरात तीन दिवस लॉकडाउन
आॅनलाइन लोकमत
शिरपूर, जि.धुळे : शिरपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमोदे येथील ४५ वर्षिय महिलेचा कारोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडालेली आहे. दरम्यान खबरदारीचे उपाय म्हणून शिरपूर शहर त्याचबरोबर आमोदे, शिंगावे, मांडळ, या गावांमध्ये २३ ते २५ एप्रिल असे तीन दिवस लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सात झाली असून, यापूर्वी दोघांचा मृत्यू झालेला आहे.
आमोदे येथील ४५ वर्षीय महिला गेल्या आठवड्यातच मुंबईहून गावी आली होती. २२ एप्रिल रोजी त्या महिलेला खोकला, तसेच श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने, तिला प्राथमिक रूग्णालयात दाखल करून तिचे स्वॅब धुळे येथे पाठविण्यात आले. तिच्यात कोरोनाचे लक्षणे आढळल्याने तिला धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याचे समजताच रात्री प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंग बादल, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी अमोल बागूल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुळकर्णी आदींची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आमोदे गाव सील करण्यात आले.
दरम्यान सुरक्षिततेचे उपाय म्हणून शिरपूर-वरवाडे नगरपरिषद क्षेत्र, आमोदे, शिंगावे, मांडळ या गावांमध्ये २३ ते २५ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.