धुळयात कोरोनाचा पहिला बळी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:16 PM2020-04-10T22:16:20+5:302020-04-10T22:17:40+5:30

साक्रीतील ५३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू मालेगावची २२ वर्षीय महिलाही निघाली पॉझीटीव्ह, धुळ्यात दाखल

Corona's first victim in the dust, | धुळयात कोरोनाचा पहिला बळी,

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात गुरुवारी रात्री मृत्यू झालेल्या तीन रुग्णांपैकी साक्री येथील ५३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू हा कोरोना विषाणूने झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. याशिवाय रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल मालेगाव येथील २२ वर्षीय तरुणीचा अहवालही पॉझीटीव्ह आला आहे. तीसुद्धा कोरोनाबाधीत आहे.
येथील भाऊसाहेब हिरे रूग्णालयात विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तिघांचा गुरूवारी रात्री मृत्यू झाला होता. त्यापैकी शिंदखेडा तालुक्यातील ६५ वर्षीय वृद्धाला श्वसनाचा व रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच अमळनेर येथील ३५वर्षीय महिला गुरूवारी रात्री उशीरा अत्यवस्थ अवस्थेत रूग्णालयात दाखल झाली होती. रूग्णालयात आल्यानंतर काही वेळातच महिलेचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला. वरील दोघांचे नमूने हे निगेटीव्ह आले होते.
मात्र क्षयरोग असलेल्या साक्री शहरातील ५३ वर्षीय व्यक्तीचे गुरूवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. हा रुग्ण ८ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल झाला होता. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना विषाणूचा बळी आहे.
मालेगावची महिला
मालेगाव येथील एक २२ वर्षीय महिला रुग्ण ९ एप्रिल २०२० रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल आहे. तिचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक व नोडल अधिकारी डॉ.आर.आय.सूर्यवंशी यांनी दिली आहे.
मृतदेह ताब्यात देण्यासंदर्भात बैठक
दरम्यान, कोरोनाबाधीत मयत वृद्धाचा मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भात कशी कारवाई करावी, यासंदर्भात रात्री शासकीय महाविद्यालयात सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर आवश्यक ती काळजी घेऊन मृतदेह आवरणाने गुंडाळून काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे दफनविधी करायला देखील कुठलीही अडचण येणार नाही. जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.
साक्री शहर सील
जिल्ह्यातील साक्री शहरातील ५३ वर्षीय वृद्ध कोरोनाचा पहिला बळी ठरला. मयत रुग्णाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रात्री नऊ वाजेनंतर साक्री शहराला सील करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरु झाली आहे. साक्री शहरात हे वृत्त वाºयासारखे पसरल्यानंतर साक्रीसह संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांनी भीती न बाळगता घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Corona's first victim in the dust,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे