पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:40 PM2020-07-31T12:40:59+5:302020-07-31T12:41:58+5:30
शिरपूर : ३ आॅगस्टपर्यंत पंचायत समितीचे कार्यालयीन कामकाज बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील पंचायत समितीतील एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्यामुळे ३० जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे़ ४ आॅगस्टपासून कार्यालय पूर्ववत सुरू राहील असे बीडीओ युवराज शिंदे यांनी सांगितले़
येथील पंचायत समितीतील काही कार्यालयीन कर्मचारी धुळ्याहून ये-जा करीत असतात़ त्यातील एकास त्यास जाणवू लागल्यामुळे त्यांनी स्वॅब दिला होता़ २९ रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालात ते बाधित आढळून आलेत़ त्यामुळे ३० रोजी येथील पंचायत समिती कार्यालयाला समजल्यानंतर तातडीने फवारणी करून कार्यालयाला सुट्टी जाहिर करण्यात आली़ त्यामुळे ३० जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे़ दरम्यान, अधिनस्त असलेले अधिकारी वा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी भ्रमणध्वनी सुरू ठेवावेत़ ४ आॅगस्टपासून पंचायत समिती कार्यालय नियमित सुरू राहील असा आदेश बीडीओ शिंदे यांनी काढला आहे़
गेल्या जुन महिन्यातील ३० दिवसापैकी ४ दिवस वगळता उर्वरीत २६ दिवसात ३८१ कोरोना बाधित आढळून आले होते़ त्यापैकी १५ जणांचा मृत्यु झाला होता़ जुलै महिन्याच्या ३० दिवसापैकी ४ दिवस वगळता उर्वरीत २६ दिवसात ४१७ बाधित आढळून आले आहेत, त्यामध्ये ७ जणांचा मृत्यु झाला आहे़ म्हणजेच गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात बाधितांची संख्या ३६ ने अधिक वाढलेली आहे़
शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरानाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे़ शहरी भागातील ८८ वसाहतींमध्ये कोरोनाने शिरकाव करून ५१३ रूग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत तर ग्रामीण भागातील ४४ गावांमध्ये ३२२ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत़ दरम्यान, शहरात कोरोना बाधितांची संख्या कमी-कमी होत असतांना ग्रामीण भागात झपाट्याने संख्या वाढू लागली आहे़
दरम्यान, ३० जुलै दुपारपर्यंत या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ८३५ पर्यंत पोहचली आहे़ आतापर्यंत ६४४ कोरोनामुक्त झाले आहेत़