अखेर पती-पत्नीची झाली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:36 PM2020-07-25T12:36:50+5:302020-07-25T12:37:04+5:30

ग्रामस्थांची समयसुचकता : आॅपरेशन मुस्कानअंतर्गत पोलिसांची कामगिरी

The couple finally met | अखेर पती-पत्नीची झाली भेट

अखेर पती-पत्नीची झाली भेट

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : तालुक्यातील अलाणे येथील ग्रामस्थांच्या समयसुचकतेने व शिंदखेडा पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी २८वर्षीय मानसिक संतुलन बिघडलेल्या गुजरातमधील अंकलेश्वर येथील तरुण महिलेला तिच्या पतीपर्यंत पोहोचविण्यात शिंदखेडा पोलिसांना यश आले.
पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी व पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, हवालदार रफिक मुल्ला, प्रभाकर सोनवणे, रवींद्र माळी, कैलास महाजन, एकलाख पठाण, पो.कॉ. ललित काळे, प्रियंका उमाळे यांच्या पथकाने ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत रात्रंदिवस तपासचक्रे फिरवून अवघ्या तीन दिवसात सदर तरुणीला सुखरूप तिच्या पतीपर्यंत पोहोच करण्यात यश मिळविले.
१९ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अलाणे येथील माजी सरपंच नारायणसिंग दाजभाऊ यांच्या घरात अचानक एक २८वर्षीय तरुण महिला आली. यावेळी त्यांच्यासह गावातील महिला व नागरिकांनी त्या तरुणीची विचारपूस केली. मात्र, सदर महिलेला काही सांगता येत नव्हते. ती ज्या भाषेत बोलत होती ते गावकऱ्यांना समजत नव्हते. त्यावेळी ग्रामस्थांना सदर महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याचे आले. तोपर्यंत गावातील ज्येष्ठ नागरिकांसह विद्यमान सरपंच मानसिंग गिरासे, पोलीस पाटील सरदारसिंग गिरासे पोहोचले. महिला तरुण असल्याने व मानसिक संतुलन बिघडले असल्याने खबरदारी घेत पोलीस पाटील, सरपंच व गावकऱ्यांनी तिला रात्री कुठेही जाऊ न देता जेवण दिले व मंदिरात तिची राहण्याची व्यवस्था केली. तोपर्यंत रात्रीचे १० वाजले होते. याबाबत सकाळी पोलीस पाटील यांनी शिंदखेडा पोलिसात खबर दिली. त्यानुसार २० जुलै रोजी शिंदखेडा पोलिसांनी सदर महिलेला महिला पोलिसांच्या मदतीने सकाळीच ताब्यात घेतले. मात्र, सदर महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ती काहीही सांगण्यात असमर्थ ठरली. पोलिसांनी तिला तात्काळ धुळे येथे जिल्हा रुग्णालयात नेले व सर्वप्रथम कोविड चाचणी केली. त्यानंतर सदर महिलेस धुळे येथील महिला आश्रय गृहात दाखल करण्यासाठी नेले. मात्र तेथे दाखल करण्यास तेथील व्यवस्थापनाने नकार दिल्यामुळे शिंदखेडा पोलिसांनी त्या महिलेस पुन्हा शिंदखेडा पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी त्या महिलेची जेवणाची व राहण्याची व्यवस्था पोलिस स्टेशनमध्ये करून महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका उमाळे यांना देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केले. उमाळे यांनी सदर महिलेला विश्वासात घेत नाव, गाव विचारले असता तिने फक्त हिना असे तिचे नाव सांगितले. त्यानंतर तिला अजून विश्वासात घेऊन विचारले असता तिने एक मोबाईल क्रमांक आठवून आठवून दिला. तो महिला पोलिसांनी लावला असता तो चुकीचा होता. मात्र, पोलिसांनी तोच मोबाईल नंबर वापरून मागील क्रमांक बदल करून फोन लावणे सुरूच ठेवले. त्यात एक क्रमांक गुजरात मधील आसापालव सोसायटी घर नं. ७२ अंकलेश्वर (गुजरात) येथील रंगकाम करणारे जितेंद्र कांशीराम पटेल नामक व्यक्तीने उचलला. त्यांना सर्व हकीकत पोलिसांनी सांगितल्यावर त्यांनी सदर महिला ही माझी पत्नी असून तिचे नाव हिना उर्फ दक्षा आहे. ९ वर्षांपासून आम्ही एकत्र राहत असून दोन महिन्यांपासून तिचे मानसिक संतुलन बिघडले असून आम्ही तीन दिवसांपासून तिचा शोध घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर २२ जुलै रोजी पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून तिला तिच्या पतीकडे सुपूर्द केले. यामुळे पतीच्या आनंदाला पारावावर उरला नव्हता.

Web Title: The couple finally met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.