जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर होताहेत रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:32+5:302021-05-31T04:26:32+5:30
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागली आहे. बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड केअर सेंटर रिकामे होऊ ...
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागली आहे. बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड केअर सेंटर रिकामे होऊ लागले आहेत. शिंदखेडा कोविड केअर सेंटर पूर्णपणे रिकामे झाले असून सामोडे व शिंगावे कोविड केंद्रात केवळ एक रुग्ण दाखल आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग लक्ष्य ठरला होतो. त्यामुळे कोविड केअर केंद्रात पहिल्या लाटेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. ग्रामीण भागात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने कोविड केअर सेंटरवरील भार वाढला होता. मात्र रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड सेंटर रिकामे होऊ लागल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सध्या सामोडे कोविड केअर सेंटरमध्ये १, भाडणे ८, शिंगावे १ व धुळे तालुका कोविड सेंटरमध्ये १३ रुग्ण उपचार घेत आहेत.
शिंदखेडा कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही -
शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर सध्या पूर्णपणे रिकामे झाले आहे. मागील दोन दिवसांपासून या ठिकाणी एकही रुग्ण दाखल झालेला नाही. मागील वर्षी मे महिन्यात हे १५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. सध्या एकही रुग्ण नसलेल्या या सेंटरमध्ये मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एकाचवेळी ८० रुग्ण दाखल होते.
दोंडाईचा कोविड केअर सेंटरमध्ये ३ रुग्ण -
दोंडाईचा येथील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर २६ मार्चपासून १५० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ५४८ रुग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात संपूर्ण कोविड सेंटर रुग्णांनी भरून गेले होते. एकाचवेळी १२० रुग्ण दाखल झाले होते.
भाडणे कोविड सेंटरमध्ये ८ रुग्ण -
भाडणे कोविड केअर सेंटरमध्ये ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १२ एप्रिल २०२० रोजी सुरू झालेले हे जिल्ह्यातील पहिले कोविड केअर सेंटर आहे. १० एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोविड केअर सेंटरची १०० खाटांची क्षमता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकाच वेळी ८० रुग्ण दाखल होते.