स्वातंत्र्याबाबत जनतेत जनजागृती निर्माण केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:37 PM2019-08-14T22:37:42+5:302019-08-14T22:38:03+5:30
आठवण : स्वा.सै.कमलाकर बोळे यांच्याकडून उजाळा
विशाल गांगुर्डे ।
पिंपळनेर : महात्मा गांधींनी अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रेरीत होऊन पिंपळनेर येथील स्वातंत्र्य सैनिक कमलाकर शंकर बोळे यांनीही स्वातंत्र्य संग्रमात सहभाग घेतला. अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याचे महत्व त्यांनी लोकांना पटवून दिले.
स्वातंत्र्य सैनिक असलेले कमलाकर बोळे यांनी स्वातंत्र्य संग्रमाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, वडील शंकर बोळे हे गावातील पहिले स्वातंत्र्य सैनिक, कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. बोळे यांचे घर हे राष्टÑीय कार्यकर्त्यांचे आश्रयस्थानच होते. सर्व गुप्त बैठका त्यांच्या घरीच होत असत. वडीलांनी प्रक्षोभक भाषण केल्याने, व लोकजागृती केल्याने, त्यांना अटक झाली. कारागृहात त्यांच्यासमवेत खान्देश गांधी बाबुभाई मेहता, विनोबा भावे, सानेगुरूजी ही मंडळी होती.
कॉँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन फैजपूरला झाले. वडीलांसोबत फैजपूरला जाण्याचा योग आला. तेथे महात्मा गांधी, पंडीत नेहरू, वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, या सर्व राष्टÑपुरूषांना पाहून कॉँग्रेसच्या विचारसणीने भारावलो. ब्रिटीशांच्या जुलमी राजसत्तेविरूद्ध लोकजागृती करणे, गांधींजींच्या विचारसरणीप्रमाणे अहिंसक मार्गाने लोकांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून देण्याचे काम सुरू केले.
पुढे शिक्षणासाठी सटाण्याला गेलो. परंतु स्वातंत्र्याची ओढ लागल्याने, शिक्षणात लक्ष लागत नव्हते. स्वातंत्र्यासाठी वंदेमातरमच्या घोषणा देत प्रभातफेºया काढायचो. स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जनतेत जनजागृती करण्याचे काम आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.