धुळ्यात वीज कंपनीसह महापालिकेविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 10:41 PM2020-01-11T22:41:09+5:302020-01-11T22:41:26+5:30
मुलाचे मृत्यू प्रकरण : तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याने घडली दुर्घटना
धुळे : साक्री रोडवरील कुमारनगरात चार वर्षाच्या मुलाला विद्युत पोलच्या शॉकमुळे मृत्यू झाला होता़ त्या पोलला शॉक लागत असल्याची तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे़ यामुळे वीज वितरण कंपनीसह महापालिकेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
साक्री रोडवरील कुमार नगरात राहणारे निशांत महेंद्रकुमार रेलन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, पुतण्या लव्यम प्रशांत रेलन (४) हा १० डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरासमोर असलेला बी-पी/०२ क्रमांकाच्या विद्युत पोलजवळ खेळत असताना त्याला इलेक्ट्रिक पोलचा विजेचा शॉक लागला़ त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़
सदरहू क्रमांकाच्या पोलमधून विद्युत प्रवाह येऊन शॉक लागत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे घरासमोर राहणारे कमलाकर सेनापती इंदवे यांनी त्यांच्या मोबाईलवरुन महावितरण कंपनीला नोव्हेंबर २०१९ मध्ये आॅनलाईन तक्रार केली होती़ तरी देखील महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पोलमधील दोष दुरुस्त केला नाही़ परिणामी लव्यम याला शॉक लागून मृत्यू झाला़ यासंदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याबाबत महावितरण कंपनीला तक्रारी अर्ज दाखल केले़
त्याअनुषंगाने विद्युत निरीक्षक एच़ एऩ गांगुर्डे यांनी केलेल्या चौकशीत घटनास्थळी वीज कंपनीचा विद्युत पोल असून त्यावर ११ केव्ही उच्चदाब व लघुदाब तार मार्गाची एकत्रितपणे उभारणी केली होती़ या लोखंडी पोलच्या क्लॅम्पला महापालिकेची विद्युत मीटर पेटी मधून निघालेली १० स्वेक्अर एमएम सर्व्हिस वायर इन्सुलेटरचा वापर न करता दुसºया वायरच्या सहाय्याने बांधलेली होती़ या सर्व्हिस वायरचे आणि तिला बांधलेल्या दुसºया वायरचे आवरण वितरल्याने आतील विद्युत भारीत तारांचा एकमेकांशी स्पर्श होत असल्याने लोखंडी पोल विद्युत भारीत होत होता़ त्यावरील विद्युत संच मांडणीवर योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे सदरची घटना घडली असल्याचा आरोप करीत वीज वितरण कंपनी आणि धुळे महापालिका हे दोघेही संयुक्तरित्या जबाबदार असल्याबाबतचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे़ परिणामी जबाबदारी आणि कर्तव्य असताना देखील त्यांनी त्यांच्या कर्तव्यात निष्काळजी व हलगर्जीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याने शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़