तरुणाला मारहाण, हिरामण गवळींवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 07:23 PM2019-04-30T19:23:32+5:302019-04-30T19:23:56+5:30
आझादनगर पोलीस : पैसे वाटपाचा संशय, हिरामण गवळींचा पोलिसात अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पैसे वाटप केल्याचे मोबाईलमध्ये शुटींग केल्यामुळे मारहाण करीत मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पार्टीचे स्विकृत नगरसेवक हिरामण गवळी यांच्यासह अन्य दोन ते तीन जणांविरुध्द सोमवारी रात्री गुन्ह नोंदविण्यात आला़
याप्रकरणी नगावबारी परिसरातील विकास बळीराम राठोड (२५) या तरुणाने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, शहरातील गिंदोडीया हायस्कूलमध्ये मतदान केंद्र होते़ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या शेजारी रस्त्यावर काही कार्यकर्ते भाजपाला मतदान करावे म्हणून पैसे वाटप करीत होते़ त्यामुळे या प्रकारचे विकास राठोड याने मोबाईलमध्ये शुटींग केले़ यावेळी नगरसेवक हिरामण गवळी व काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली़ तसेच माझा महागडा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला़ हा प्रकार सोमवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडला़
या घटनेनंतर विकास राठोड आणि त्यांच्या मित्रांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानुसार, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हिरामण गवळी व अन्य तीन जणांविरुध्द मोबाईल लूट व मारहाण प्रकरणी भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
हिरामण गवळी यांचा
पोलिसात अर्ज सादर
भाजपाचे नगरसेवक हिरामण गवळी यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात अर्ज सादर करत माझ्याविरुध्द करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे़ रजकीय द्वेषापोटी अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर मारहाण व मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ माझ्याकडून असा कुठलाही प्रकार घडलेला नाही़ मी २७ एप्रिल रोजी जाहीर केले होते की, मंदिराची तोडफोड करणारे, नदीपात्रात अनधिकृत पुतळा बसविला याविरुध्द आंदोलन करण्याचे जाहीर केले़ त्याचमुळे मला बदनाम करुन अडकविण्यासाठी ही तक्रार देण्यात आलेली आहे़ सदर व्यक्तीला कुठलीही मारहाण झालेली नाही़ या घटनेचा योग्य तपास करावा, असेही हिरामण गवळी यांनी अर्जात नमूद केलेले आहे़