दिनेश गायकवाडचे चंद्रपुरपर्यंत धागेदोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:38 PM2017-08-21T17:38:18+5:302017-08-21T17:38:57+5:30
तपासातून बाब उघड : अद्यापही संशयित फरार
त्याच्या चौकशीतून दिनेश गायकवाड याचे नाव समोर आले़ त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी धुळे तालुक्यातील शिरुड येथे आलो असता तो पळून गेला, अशी माहिती गोंडपिंपरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी ‘लोकमत’शी दिली़
चंद्रपुर जिल्ह्यात विदेशी दारु आढळल्यामुळे एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले़ ९ आॅगस्ट रोजी याप्रकरणी गोंडपिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हीबिशन कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ प्राथमिक चौकशीतून धुळे तालुक्यातील शिरुड येथील दिनेश निंबा गायकवाड याचे नाव समोर आले़ त्यामुळे त्याला चौकशीकामी ताब्यात घेण्यासाठी गोंडपिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देवाजी बोरकुटे आपल्या पोलीस पथकासह शिरुड (ता़धुळे) येथे आले होते़ शिरुड शिवारातील नाना श्यामजी पाटील यांच्या शेतात रविवारी सकाळी ८ ते साडेआठ वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यापुर्वी काही जणांनी वाद घातला़ शासकीय कामात अडथळा आणला़ वाद घालत असतानाच दिनेश गायकवाड याला पळून जाण्यास मदत केली़ त्यामुळे रविवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली़
त्यानुसार दिनेश निंबा गायकवाडसह प्रविण निंबा गायकवाड, बंडू निंबा गायकवाड आणि सोपान परदेशी (सर्व रा़ शिरुड ता़ धुळे) यांच्याविरुध्द संशयावरुन भादंवि कलम ३५३, १८६, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे़