पावसाच्या खंडामुळे पिके करपण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 06:54 PM2017-08-16T18:54:21+5:302017-08-16T18:55:30+5:30
शेतकरी संकटात : १० महसूल मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात पावसाने दुसºयांदा खंड दिला असून पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांपैकी १० मंडळांमध्ये आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला असून तेथील पिके करपत चालली आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. परंतु मध्ये दोनवेळा पावसाने खंड दिल्याने पिकांना तसेच प्रकल्पांनाही फारसा फायदा झालेला नाही.
जून महिन्यात झालेल्या पावसानंतर पेरण्यांना प्रारंभ झाला. परंतु नंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ ओढवली होती. बहुसंख्य शेतकºयांनी दुबार पेरणीही केली. परंतु १३ जुलैपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले. परंतु आठवडाभर केवळ रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे पिकांना तात्पुरते जीवदान मिळून उर्वरीत पेरण्या आटोपल्या. मात्र त्यानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.