अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

By अतुल जोशी | Published: September 20, 2022 05:51 PM2022-09-20T17:51:52+5:302022-09-20T17:52:03+5:30

रविवारी मध्यरात्री धुळे तालुक्यातील आर्वी, बोरकुंड, धुळे खेडे, व कुसुंबा या चारही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली.

Crops on 30,000 hectares in Dhule taluka have been affected due to heavy rains | अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

googlenewsNext

धुळे : तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे चार महसूल मंडळात ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. दरम्यान नुकसानीचे पंचनामे सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे अगोदर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यातच शनिवारी व रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पिकाच्या नुकसानीत भर पडलेली आहे.

रविवारी मध्यरात्री धुळे तालुक्यातील आर्वी, बोरकुंड, धुळे खेडे, व कुसुंबा या चारही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. यात आर्वीला सर्वाधिक १५९ मि.मी., बोरकुंडला ११० मि.मी., धुळे खेडे व कुसुंबा येथे ७४.८० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. अतिवृष्टीमुळे या चारही महसूल मंडळात खरिपाच्या जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक फटका कापूस व मका पिकाला बसला आहे.

धुळे तालुक्यात एकूण एक लाख ७ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली असून, त्यापैकी ८४ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. अतिपावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने, कपाशीची बोंड काळी पडले असून, यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले आहेत. कृषी, महसूल व तलाठी यांच्यामार्फत पंचनामे करण्यात येत आहे.

Web Title: Crops on 30,000 hectares in Dhule taluka have been affected due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.