शिरपूर तालुक्यात पिके बहरली, मात्र धरणांमध्ये ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:38 AM2019-07-17T11:38:28+5:302019-07-17T11:39:17+5:30
आतापर्यंत केवळ ३३ टक्के पाऊस, दुबार पेरणीच्या संकटाची धास्ती
सुनील साळुंखे ।
आॅनलाइन लोकमत
शिरपूर : पावसाळा सुरू होऊन पावणेदोन महिने होत आले तरी तालुक्यात काही परिसरात पिकांना पोषक असा पाऊस झालेला नाही़ नदी-नाले वाहून निघालेले नाहीत़ असे असतांनाही ६९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत़ आतापर्यंत केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून, झिमझिम पावसातही चांगलीच पिके बहरली आहेत़
पळासनेर, अर्थे परिसरात सुरूवातीला झालेल्या पावसामुळे नाले वाहून निघालेत, मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारली़ काही भागात झिमझिम पावसाच्या भरोशावर पेरणी करून पिके सुध्दा यंदा चांगलीच बहरली आहे़ मात्र अजून पर्यंत तालुक्यात धो-धो पाऊस झालेला नाही़ या महिन्याअखेर पर्यंत मुसळधार पाऊस न झाल्यास पिकांना मोठ्या फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही़
तालुक्यात आजअखेर एकूण सरासरीच्या ३३ टक्के पाऊस आतापर्यंत झालेला आहे़ शिरपूर मंडळात २१६, थाळनेर १००, होळनांथे १०३, अर्थे १६८, जवखेडा २२१, बोराडी १५२, सांगवी १२४ मिमि असा पाऊस झालेला आहे़ सर्वात कमी थाळनेर मंडळात तर सर्वाधिक पाऊस शिरपूर मंडळात झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे़
यंदा हवामान खात्याने मान्सून वेळेवर होईल, पाऊस भरपूर होईल असा अंदाज वर्तविला होता़ त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात होता़ पाण्याअभावी काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. बियाणे व खते यांच्या अतोनात भाव वाढीमुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. दुबार पेरणीची वेळ आल्यास काय करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
तालुक्यात १६ लहान मोठे धरणे आहेत. यापैकी अनेर, खामखेडा, जळोद,वाडी, गधडदेव, मिटगांव, बुडकी,रोहिणी,विखरण ही धरणे कोरडीठाक पडल्याने चिंतेत भर पडली.