धुळ्यात युद्धसाहित्याचे प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:26 PM2018-09-30T13:26:06+5:302018-09-30T13:28:15+5:30
एसआरपीएफच्या मैदानावर सुरू आहे प्रदर्शन, दुपारच्या सत्रात चित्तथरारक प्रत्याक्षिके
आॅनलाईन लोकमत
धुळे : येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर भरविण्यात आलेले रणगाडे व युद्धसाहित्याचे प्रदर्शन बघण्यासाठी रविवारी शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. ‘आगे बढो’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे़
शनिवारी हे प्रदर्शन मांडण्यात आले. मात्र त्याच दिवशी अनेकांनी हे प्रदर्शन पाहण्याचा मनमुराद आनंद घेतला.
रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले होते. सकाळी साडेआठ वाजेपासूनच नागरिकांची पाऊले एसआरपीएफच्या मैदानाकडे वळू लागली होती. बघता बघता या मैदानावर हजारो नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषत: अनेकजण परिवारासह आले होते. पालक आपल्या पाल्यांना प्रत्येक युद्ध साहित्य दाखवित होते. हे युद्ध साहित्य, रणगाडे, तोफा बघतांनाही लहान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या चेहºयावर अतिशय कुतुहुलता दिसून येत होती.
या प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण ठरते आहे ती बोफोर्स तोफ. १९८९ मध्ये १५५ मि.मी. बोफोर्स तोफ भारतीय सैन्यात दाखल झालेली आहे. तीचे वजन ११ हजार ५०० किलोएवढे आहे. ही तोफ ३१ किलोमीटर अंतरापर्यंत गोळाफेक करू शकते. तोफेत असलेल्या एका गोळ्याचे वजन तब्बल ३४ किलो एवढे आहे. १४ सेकंदामध्ये तीनवेळा या तोफेतून फायर होत असते. यात सैन्य दलाचे ९ जवान असतात.या तोफेचा वापर कारगीलच्या युद्धातही करण्यात आलेला होता. अनेकांनी अतिशय कुतुहलतेने ही तोफ बघीतली. या तोफेविषयीची माहिती भारतीय सैन्याचे जवान मराठीतून देत होते.
याशिवाय बीएमपी-२ अर्थात बोलविया मशीनो पिकोते रणगाडा, टी-९० हा रशियन बनावटीचा रनगाडा,फ्लाईकैचर रडार, भारताने तयार केलेली १०५ मि.मी.भारतीय फिल्ड तोफ, रशियन बनावटीची १३० मी.मि. तोफ एम-४६ ,बॉम्ब निकामी करणारे रिमोट चलित छोटे वाहन, मल्टी युज रेबोट व्हेईकल, दारूगोळा शोधण्याचे यंत्र, कारबाईन मशीन गन ९ एम.एम, ९ मिलीमीटरचे पिस्तोल, ५.५६ मि.मी.ची इन्सास रायफल, आदी साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहे. हे प्रत्येक युद्धसाहित्य बघतांना प्रत्येकाच्या चेहºयावर उत्सुकता, कुतुहुलता दिसून येत होती. सैन्याचे अधिकारीही प्रत्येक युद्ध साहित्याबद्दल नागरिकांना माहिती देत होते.