नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 09:41 PM2019-02-15T21:41:39+5:302019-02-15T21:42:34+5:30
शिरपूर तालुका : बोराडी श्री सतीदेवी यात्रोत्सवात लाखोंची उलाढाल
शिरपूर : तालुक्यातील बोराडी गावाची ग्रामदेवता श्री सतीदेवीच्या यात्रोत्सवाला परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली़ अनेकांनी नवस फेडण्यासाठी गर्दी केली़ दोन दिवसाची यात्रा असल्यामुळे दोन दिवस लोकनाट्याचा कार्यक्रम झाला़
बोराडी-पानसेमल रस्त्यावर श्री सतीदेवीचे पुरातन मंदिर असून मंदिराच्या जवळच एक लहान नदी वाहते, या नदीस सतीमाय नदी सुध्दा म्हटले जाते़ गेल्या वर्षी पर्यटन विकास निधीतून या मंदिरासाठी २ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ त्यामुळे मंदिर सुशोभीकरण, सभागृह नव्याने बांधण्यात आले़ गेल्या आठवड्यात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील साजरा करण्यात आला होता़ जागृत देवस्थान असल्यामुळे परिसरासह मध्यप्रदेशातील भाविकांनी नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती़
सालाबादाप्रमाणे यात्रेच्या दिवशी गावातून वाजत गाजत तगतराव काढण्यात आला़ रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला़ यात्रेच्या आदल्या दिवशी सुध्दा मंदिराच्या परिसरात लोकनाट्याचा कार्यक्रम झाला़
बोराडी यात्रा तालुक्यातील सर्वात मोठी असल्यामुळे मंदिर परिसरातील व रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यवसायासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून चोपडा, शहादा, नंदुरबार, शिरपूर, थाळनेर, अमळनेर, शिंदखेडा, वाडी, वाघाडी, पळासनेर तसेच मध्यप्रदेशातील सेंधवा, पानसमेल, खेतीया आदी परिसरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांची गर्दी केली होती़
यात्रोत्सवात संसारोपयोगी वस्तू, हलवाई, मिठाईची दुकाने, लोकनाट्य तमाशा मंडळ फोटो स्टुडिओत, झुले, पाळणे, महिला श्रृंगार, मौत का कुवा, गारोडी, भाजीपाला, व्यापारी यांची गर्दी होती़ त्यामुळे यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली़ या यात्रोत्सवात आलेला प्रत्येक नागरिक गुळाची जलेबी, भजी व गोडशेव खालल्या शिवाय परत जात नाही. त्यामुळे या यात्रोत्सवात विशेष महत्त्व मिळते.
बोराडी परिसरातील जागृती देवस्थान म्हणून भाविक नवस फेडण्यासाठी यात्रेत हजेरी लावतात. मंदिर परिसरातील २० ते २५ एकर जागेत विविध व्यावसायिकांसाठी जागेचे नियोजन ग्रामपरिषदेच्या मार्फत करण्यात आले होते़ यात्रेकरुसाठी खास करून पाणपोई सेवा देण्यात आली होती तसेच ग्रामपरिषदेच्यावतीने वीज पुरवठा व आरोग्य सेवा पुरविण्यात आली़
यात्रोत्सव सुरळीत पार पडावा म्हणून ग्रामपरिषदेचे उपसरपंच तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.तुषार रंधे, सरपंच सुरेखा पावरा, गस बँकेचे माजी चेअरमन निशांत रंधे, सिताराम पावरा, यात्रोत्सव समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सांगवी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक किरणकुमार खेडकर व गावातील ग्रामस्थ यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेत़