जात प्रमाणपत्रासाठी गर्दी ना मास्क, ना डिस्टन्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 10:25 PM2020-12-26T22:25:16+5:302020-12-26T22:25:36+5:30
सामाजिक न्याय भवनातील स्थिती, आवाहन करुनही फरक पडेना
धुळे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवारांची सध्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात गर्दी होत आहे. अर्ज करण्यासाठी आलेले हे इच्छूक आणि त्यांचे प्रतिनिधी मास्क वापरत नसल्याचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे दिसून आले.
धुळ येथील साक्री रोडवरील सामाजिक न्याय भवनात विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात निवडणुकीमुळे गर्दी वाढली आहे. अर्ज करण्यासाठी आलेले विद्यार्थी मास्कचा वापर करताना दिसतात. परंतु इतर अर्जदार नियमांचे पालन करताना दिसत नसल्याने चिंता आहे. या बेफिकीरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय जिल्हाभरातून अर्जदार येत असल्याने संसर्ग अधिक पसरु शकतो.
जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. लेखी सूचना लावल्या आहेत. तसेच वेळोवेळी तोंडी सूचना देखील दिल्या जात आहेत. अधिकारी, कर्मचारींनी सूचना देवून देखील फरक पडत नसल्याचे चित्र आहे.
सुदैवाने आदिवासींसाठी नंदुरबारला स्वतंत्र समिती असल्याने धुळ्यात फारशी गर्दी नाही. दिवसभर पंधरा ते वीस जणांची रांग असते. समिती कार्यालयाच्या समोर प्रशस्त जागा असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन शक्य आहे. त्यादृष्टीने समिती प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक न्याय भवनात येणाऱ्या अर्जदारांनी काेरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
१२ वी, सीईटीचे विद्यार्थी
सामाजिक न्याय विभागात सध्या १२ वी आणि सीईटी उत्तीर्ण विद्यार्थी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्यास येत आहेत. २४ डिसेंबरपर्यंत विद्यार्थींची गर्दी होती. परंतु आता त्यांच्या संख्या कमी झाली आहे. एखाद्या विभागाकडून पत्रव्यवहाराचे अर्ज देखील येत आहेत. विद्यार्थींची फारसी गर्दी नाही.
उमेदवारांना प्राधान्य
तीन दिवस शासकीय सुटी असली तरी निवडणुकीसाठी समितीचे कार्यालय सुरुच होते. या तीन दिवसात उमदेवारांच्या अर्जांना प्राधान्य दिले जात आहे. सध्या समितीकडे इच्छूक उमेदवारांच्या अर्जांचे प्रमाण ९० टक्के आहे. विद्यार्थींचे अर्जे क्वचित प्राप्त होत आहे. सुटीच्या दिवशी विद्यार्थींचे अर्ज स्विकारले नाहीत.
प्रशासनातर्फे दक्षता
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे अर्ज करण्याकरिता इच्छूक उमेदवारांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाकडून दक्षता बाळगी जात आहे.
रोज २५० अर्ज
धुळे येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दररोज सरासरी १०० अर्ज प्राप्त होतात. सरासरी ५० प्रमाणपत्र दिले जातात. परंतु सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे दररोज सरासरी २५० अर्ज येत आहेत. आतापर्यंत ७५० अर्ज दाखल झाले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना वेळोवेळी अर्जदारांना दिल्या जात आहेत. ठिकठिकाणी सूचना फलक देखील लावले आहेत. मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. अर्ज करण्यासाठी आलेले विद्यार्थी मास्क वापरताना दिसतात. परंतु इतर अर्जदारांना मास्क वापरण्याच्या सूचना द्याव्या लागतात. गर्दी टाळण्याची दक्षता घेतली जाते.
- नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे.