गर्दी करणारे नागरिकच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:25 PM2020-05-11T12:25:31+5:302020-05-11T12:25:49+5:30
धुळ्यात ‘कोरोना’ उद्रेक : आमदारांनी दिला शासनाला दोष, माजी आमदारांचा लोकप्रतिनिधींवर रोष
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ धुळे शहरात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाची एन्ट्री होण्यास सर्वसामान्य नागरीकांसह शासन आणि प्रशासन देखील तितकेच जबाबदार आहे़
शेजारच्या मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना धुळे शहरातील नागरीकांनी लॉकडाउनमध्ये गर्दी करण्याचा प्रकार घातक ठरल्याच्या प्रतिक्रिया शहरातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत़ शिवाय लॉकडाउन नंतर संचारबंदी, जिल्हाबंदी, राज्यबंदी, वाहतूक बंदी असताना, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु असताना, पोलिसांनी सर्व रस्त्यांवर नाकेबंदी केली असताना धुळ्यातील पहिला बाधित रुग्ण मालेगावला गेलाच कसा हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे़
लॉकडाउन नंतर देखील अनेकांचा प्रवास सुरुच होता़ खाजगी वाहनांनी महानगरांमधील नागरिक आपआपल्या गावात परतण्याचे प्रमाण मोठे होते़ शहरातही दररोज ये जा सुरूच होती़ बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असा आरोग्य विभागाचा निष्कर्ष आहे़ मुंबई, पुणे, नाशिकसह इतर राज्य आणि महानगरांमधून येणाऱ्यांची संख्या शेकडोत होती़ त्यामुळे एकट्या मालेगाव शहराला दोष देण्यात अर्थ नाही़ परंतु धुळे शहरात आढळलेला पहिला रुग्ण हा मालेगाव येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा शिरकाव झाला, अशा प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्यांच्या देखील आहेत़ मालेगाव आणि धुळे अशी ये जा करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिस कमी पडल्याचे बोलले जात आहे़ अजुनही शासन, प्रशासन, पोलिस यांनी योग्य नियोजन केले आणि नागरीकांनी लॉकडाउनचे पालन केले तर कोरोनावर मात करणे सहज शक्य आहे, असा सल्ला देखील लोकप्रतिनिधींनी दिला आहे़
सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीच्या पार गेली आहे़ धुळे शहरात तब्बल ४३ जण बाधित असल्याचे आढळून आले आहे़ त्यातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ उर्वरीत २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ अनेक संशयित रुग्णांच्या अहवालाची अजुनही प्रतिक्षा आहे़
शासन जबाबदार
मुळात कोरोना विषाणू हा भारतातला नसुन तो विदेशातून आला आहे़ चीनमध्ये त्याची सुरुवात झाली़ इतर देशातून येणाºया नागरीकांमुळे भारतामध्ये त्याचा संसर्ग वाढला़ कोरोनाचा वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी आता बाहेरुन आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे़ मुळात सुरुवातीच्या काळातच विमानतळांवर विदेशातून येणाºयांची तपासणी केली असती तर आज देश कोरोनामुक्त राहिला असता़ शासनाने योग्य वेळी योग्य पाऊल उचलले नाही म्हणून देशात कोरोनाचा प्रसार झाला़ शासनाने केलेल्या चुका झाकण्यासाठी विशिष्ट लोकांवर त्याचे खापर फोडले जात आहे़ परंतु कोरोना हा विषाणू विशिष्ट व्यक्ती किंवा समुहाला पाहून येत नाही़ फरक एवढाच आहे की दाट लोकवस्तीमध्ये त्याचा संसर्ग झपाट्याने वाढतो़ अशा वस्त्यांमध्ये सुरक्षीत अंतर ठेवणे शक्य नसते़ नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे़ विनाकारण घरातून बाहेर पडू नये़ योग्य काळजी आणि दक्षता घेतली तर आपण कोरोनावर नक्कीच मात करु़
- डॉ़ फारुक शहा, आमदार
लोकप्रतिनिधी जबाबदार
धुळे शहर व जिल्हा शंभर टक्के कोरोनामुक्त होता़ परंतु धुळ्याचे लोकप्रतिनिधी सातत्याने धुळे ते मालेगाव अशा फेºया मारत होते़ देशाच्या प्रधानमंत्र्यांसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आधीच लॉकडाउन जाहीर करुन अधिवेशन मुदतपूर्व संपविले़ बाहेर न पडण्याचा सल्ला दिला़ विषयाचे गांभीर्य लक्षात न घेता धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मुक्तपणे बाहेर फिरत होते़ मतदार संघात अनावश्यक जमाव गोळा करुन सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवत नव्हते़ त्यामुळे धुळे शहर आणि धुळे जिल्हा रेड झोनमध्ये गेला़
- अनिल गोटे, माजी आमदार
लॉकडाउनचे पालन झाले नाही
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने लागु केलेल्या लॉकडाउनचे काटेकोर पालन झाले नाही़ नागरिकांनी काळजी घेतली नाही़ आजही गर्दी कायम आहे़ गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी आणखी कठोर होण्याची गरज आहे़ शासन प्रशासनाने देखील प्रयत्न वाढविणे गरजेचे आहे़ नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे़ विनाकारण बाहेर पडू नये़ दक्षता घेतली तर आपण लवकरच कोरोनावर मात करु़
- अनुप अग्रवाल, महानगर अध्यक्ष, भाजप
नागरिकांनी संयम ठेवला नाही
धुळे जिल्हा ग्रीन झोनमधून अचानक रेड झोनमध्ये आला़ शहरात कोरोनाच्या संसर्गासाठी मालेगावकडे बोट दाखवले गेले असले तरी असे कुणालाही जबाबदार धरता येणार नाही़ प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग कोरोनाशी लढत आहेत़ परंतु नागरिकांचे विनाकारण गर्दी करणे चुकीचे आहे़ जीवनावश्यक सेवांना दुपारी दोनपर्यंत परवानगी असताना दोन वाजेनंतर देखील नागरिक बाहेर का फिरतात़ गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी पोलिसांना अधिक कठोर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत़ नागरिकांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य केले तर आपण ग्रीन झोनमध्ये येवू़
- संजय गुजराथी, महानगरप्रमुख शिवसेना
अन्यथा पश्चातापाची वेळ येईल
लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात जिल्हा प्रशासनाचे काम चांगले आहे़ परंतु महानगरपालिकेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ एकीकडे प्रतिबंधित क्षेत्रांचे रस्ते बंद केले जातात आणि दुसरीकडे शेजारीच बाजार भरतो हे चुकीचे आहे़ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये संपूर्ण लॉकडाउनची अंमलबजावणी झाली नाही़ शिवाय कोरोनासाठी स्वंतत्र रुग्णालय आणि इतर रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था ही उपाययोजना सुरुवातीलाच होणे अपेक्षीत होते़ परंतु उशिरा निर्णय घेतला़ यासह इतर कारणांमुळे कोरोनाचा संसर्ग शहरात वाढला़ अजुनही नागरिक गर्दी करीत आहेत़ गर्दीवर नियंत्रण मिळविले तर मे अखेरपर्यंत कोरोनाची संसर्ग साखळी तुटेल़ लोकांनी कामानिमित्तच बाहेर पडावे़ अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल़
- युवराज करनकाळ, शहराध्यक्ष, काँग्रेस
मनपाचा नियोजनशुन्य कारभार
महानगरपालिकेचे अधिकारी बाहेर येण्यास घाबरतात़ कार्यालयात बसुन प्रभावी उपाययोजना होणे शक्य नाही़ रस्त्यावरची परिस्थिती पाहून उपाययोजना होताना दिसत नाही़ दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना बाधित मृत व्यक्तीचे प्रेत अर्धवट दहन झाले़ मनपाचा नियोजनशुन्य कारभार सुरू आहे़ शहरातील जनतेला वाºयावर सोडले आहे़ हिरे रुग्णालयात देखील सुरुवातीला कोरोनासह इतरही रुग्ण एकत्र होते़ या साºया गोष्टींमुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला़ अजुनही वेळ गेलेली नाही़ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महानगरपालिकेकडे केली आहे़
- कैलास चौधरी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यास धुळेकर नागरिक जबाबदार असल्याचे दुर्दैवाने म्हणावेसे वाटत आहे़ विनाकारण बाहेर पडू नका, गर्दी टाळा, यासह विशेष दक्षता घेण्याचे आवाहन शासन, प्रशासन, पोलिस आणि महानगरपालिकेची यंत्रणा सातत्याने करीत आहे़ परंतु नागरिक सहकार्य करीत नाही़ घरातच बसण्याचे सांगितले आहे़ तरी देखील घरात थांबत नाहीत़ महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत़ परंतु तरी देखील काही लोकांच्या चुकांमुळे धुळे शहराला गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत़ नागरिकांना संयम नाही़ ४८ तास जरी नागरीक घरात बसून राहिले तरी कोरोनाची संसर्ग साखळी खंडीत होण्यास मदत होईल़ त्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे़ त्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे़
- चंद्रकांत सोनार, महापौर
तिरंगा चौकात आढळला पहिला रुग्ण
४धुळे शहरात तिरंगा चौक परिसरात २० एप्रिल रोजी पहिला रूग्ण आढळला. बाधीत ४५ वर्षीय पुरूषाचे मालेगाव येथे नेहमी येणे - जाणे असल्याचे स्पष्ट झाले होते. २३ एप्रिल रोजी या रूग्णाचा मृत्यू झाला.
४दरम्यान, १० एप्रिल रोजी साक्री येथील ५३ वर्षीय प्रौढाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला हा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिला रूग्ण होता. सदर व्यक्तीने कुठेही प्रवास केलेला नव्हता़ त्यामुळे त्याला कोरोनाची लागण कशी झाली ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. बाधीत रूग्णाला विविध व्याधींनी ग्रासले होते. साक्री व धुळे येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तो दाखल झाला होता. १० एप्रिल रोजी या रूग्णाचा मृत्यू झाला होता.
४शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे ७० वर्षीय वृध्द महिलेस कोरोनाची लागण झाली़ या महिलेने कुठेही प्रवास केला नव्हता़ शिवाय तिच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत़ गावातही कुणाला कोरोनाची लागण नाही़ मग या महिलेला कोरोना झाला कसा याची माहिती नाही़