धुळ्यातील एकवीरादेवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 01:57 PM2019-10-07T13:57:26+5:302019-10-07T13:57:45+5:30
अष्टमीला आठ जोडप्यांच्या हस्ते झाली पूजा
आॅनलाइन लोकमत
धुळे : नवरात्रोत्सवातील महत्त्वाचे पर्व समजल्या जाणाऱ्या महाअष्टमीदिनी रविवारी खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी मंदिरात नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. आठ जोडप्यांच्या हस्ते आहुती देण्यात आली. अष्टमीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दिवसभरात खान्देशसह राज्यातील व परराज्यातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
एकवीरादेवी मंदिरात अष्टमीला सकाळी ११ ते सायंकाळी ४ यावेळेत होमहवन, नवचंडी यज्ञ, पूर्णाहूती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य भाविकांनी मंदिराच्या आवारात चक्रपूजा केली. त्यासाठी सर्व आबालवृद्ध भाऊबंद एकत्र आले होते. पौराहित्य प्रदीप अंबादास जोशी, धनंजय भंडारी यांच्यासह ११ ब्रह्मवृंदानी केले. यावेळी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, कार्यकारी अध्यक्ष मधुकर गुरव, यांच्यासह मनोहर गुरव, चंद्रशेखर गुरव, भरत देवळे, दत्ता शिंदे निलेश गुरव, नंदलाल गुरव आदी उपस्थित होते.
दर्शनासाठी गर्दी
या दिवशी दर्शनाचेही महत्त्व असल्याने भाविकांची गर्दी झाली होती. चोख बंदोबस्तामुळे गर्दी असतांनाही सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला .दरम्यान शहरातील संतोषी माता मंदिर, कालिका माता मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली होती.
सोमवारी महानवमीनिमित्त मंदिरात सकाळी १० वाजता सुवासिनी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच विजयादशमी उत्सव देखील साजरा करण्यात येणार आहे.