धुळे: सुटीवर आलेल्या जवानाची गाडी चुकली; पुलवामात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, कुटुंबाला संशय
By देवेंद्र पाठक | Published: May 18, 2023 05:05 PM2023-05-18T17:05:02+5:302023-05-18T17:08:20+5:30
केंद्रीय राखीव दल अर्थात सीआरपीएफमध्ये योगेश बिऱ्हाडे कार्यरत होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा म्हणून त्याची ओळख होती.
धुळे : धुळ्यातील जवानाने जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे ड्यूटीवर असताना स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. योगेश अशोक बिऱ्हाडे (वय ३७, रा. आनंदनगर, भोई सोसायटी, धुळे) असे मृत जवानाचे नाव आहे. दरम्यान, त्या आत्महत्येमागील नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.
केंद्रीय राखीव दल अर्थात सीआरपीएफमध्ये योगेश बिऱ्हाडे कार्यरत होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा म्हणून त्याची ओळख होती. २५ जानेवारी २००६ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यांनी छत्तीसगड, मुंबई येथील तळोजा, त्यानंतर जम्मू-काश्मीर, नांदगाव येथेही सेवा दिली. सध्या ते जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे देशसेवा बजावत हाेते. ते रजेवर असल्याने धुळ्यातील घरी आलेले होते. त्यांची रजा संपल्यानंतर ४ मे रोजी ड्यूटीवर हजर होण्यासाठी निघाले होते. मात्र, जाताना त्यांची गाडी चुकली होती. त्यामुळे त्यांना जाताना उशीर झाला होता. या कारणावरून त्यांना अधिकाऱ्यांनी त्रास दिला असावा असा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.
आपले कर्तव्य बजावत असतानाच बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जवान योगेश बिऱ्हाडे यांनी व्हिडीओ कॉल केला होता. तेव्हा ते पत्नी रामेश्वरी यांच्यासह मुलगा व एक वर्षाच्या मुलीशी संवाद साधला होता. त्यादरम्यान त्यांचा चेहरा तसा उतरलेला दिसत हाेता. काहीतरी तणावात ते दिसून येत होते. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास योगेश बिऱ्हाडे यांनी कर्तव्य बजावत असतानाच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी आक्रोश केला. इतके टोकाचे पाऊल याेगेश यांनी का उचलले, असा सवाल कुटुंबीयांकडून उपस्थित होत आहे. सीआरपीएफ ड्यूटीतील तीन ते चार वर्षांचा कालावधी त्यांचा राहिलेला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, १ वर्षाची मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, शहीद जवान यांचे पार्थिव जम्मू-काश्मीर येथून पुणे येथे आणले जाईल. त्यानंतर आर्मीच्या वाहनाने त्यांचे पार्थिव रात्री १२ वाजेपर्यंत धुळ्यात येणार आहे. भोई सोसायटीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.