धुळ्यातील ‘त्या’ घटनेतील दोषींना निश्चित शासन होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 02:53 PM2017-12-21T14:53:54+5:302017-12-21T14:58:29+5:30
विनयकुमार चौबे : सीसीटीव्हीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील गजानन कॉलनी, अरिहंत मंगल कार्यालय परिसरात बुधवारी रात्री तणाव झाला होता़ या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने दोषींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़ या घटनेत कोणाचा किती संबंध आहे, हे तपासून दोषींना शासन केले जाईल, असे नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
शहरातील ८० फुटी रोडवरील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात किरकोळ कारणावरुन बुधवारी रात्री दोन समुदायात दंगल उसळली़ या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता़ अधिकाºयांसह पोलिसांनी घटनास्थळी जावून परिस्थिती नियंत्रणात आणली़ या घटनास्थळाची पाहणी गुरुवारी दुपारी विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी केली़ यावेळी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़
चौबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली़ त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात चौबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, जी काही घटना घडली ती उचित नाही़ त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे़ घटना आटोक्यात आली आहे़ याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे़ हे प्रकरण गांभिर्याने घेतले असून जे होईल ते कायदेशीर केले जाईल़ अशी घटना यापुढील काळात पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल़ हा परिसर अतिसंवेदन असल्यामुळे स्वतंत्र चौकीसह वायरलेस प्रणाली, आवश्यक त्या प्रमाणात पोलीस तैनात केले जातील़ सीसीटीव्ही कॅमेराबाबत शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले़
शिवसेनेने दिले निवेदन
विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांना शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी घटनेसंदर्भात निवेदन सादर केले़ यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, प्रा़ शरद पाटील, महेश मिस्तरी, अतुल सोनवणे, संजय गुजराथी, सतिष महाले उपस्थित होते़ या पदाधिकाºयांनी बुधवारी घडलेल्या घटनेचा वृत्तांत कथन केला़ नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली़ हा परिसर संवेदनशिल असून पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली़ सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर योग्य ती दखल घेतली जाईल़ दोषींना शासन होईल़ सर्व बाबी तपासूनच चार्जशिट दाखल केले जाईल असे आश्वासन चौबे यांनी दिले़