Vidhan sabha 2019: उमेदवारांविषयी उत्सुकता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 01:12 PM2019-09-29T13:12:24+5:302019-09-29T13:12:45+5:30
विधानसभा निवडणूक। उमेवारी अर्जांसाठी आता उरले अवघे चार दिवस
धुळे : राज्य विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान आघाडी व युतीतर्फे अधिकृत जागावाटप तसेच उमेदवारीबाबत अधिकृत घोषणाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे या विषयी सर्वत्र मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. तर सलग दोन दिवसांच्या सुटीमुळे अर्ज दाखल करण्यासाठी आता उमेदवारांच्या हाती अवघे चार दिवस उरले आहेत.
पहिल्या दिवशी ५५ अर्ज वितरित
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवार प्रसिद्ध झाली असून ४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. पहिल्या दिवशी केवळ अर्ज वितरित झाले. एकही अर्ज दाखल झाला नाही.
अर्ज भरण्यासाठी आठवडाभराची मुदत असली तरी या दरम्यान तब्बल तीन सुट्या येत आहेत. २८ रोजी चौथा शनिवार व २९ रोजी रविवारची सुटी आहे. तर २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय कार्यालयांना सुुटी असणार आहे. त्यामुळे या दिवशी निवडणुकीचे कोणतेही कामकाज होणार नसल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्या मुळे अवघे चार दिवस उरतात.
उमेदवारीच्या घोषणेकडे लक्ष
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी आणि भाजपा व शिवसेना युती यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा न झाल्याने उत्सुकता कायम आहे. घटस्थापनेचा मुहुर्त पाहून नावे जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष घोषणेकडे लागले आहे.