निजामपूर येथे लुटमार करणारा वसंत पवार पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:56 PM2018-04-07T12:56:14+5:302018-04-07T12:56:14+5:30
निजामपूर : अवघ्या अर्धा तासातील कामगिरी, अनेक गुन्हे उघड होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : कोल्हापूरच्या व्यापाºयाला लुटणारा, २०१६ पासून पोलिसांच्या हिट लिस्टवर असणारा, सुझलॉनची तार चोरणारा संशयित वसंत पवार याला निजामपूर पोलिसांनी पाठलाग करुन अवघ्या अर्धातासात शनिवारी सकाळी पकडले़ त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून ५ संशयितांची नावे समोर येत आली आहे़ निजामपूर पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत़
मालेगाव येथील गौरव संजय येवले या भंगार खरेदी विक्री व्यावसायिकास साक्री तालुक्यातील जामदे येथील वसंत पवार याने फोन करून सुझलॉन कंपनीची तांब्याची तार आहे, तिची विक्री करावयाची असल्याचे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी दुपारी २ वाजता गौरव येवले व त्याचा मित्र अशोक नारायण उबाळे हे मालेगाव येथून दुचाकीने टिटाणे फाट्यावर पोहोचले. तेथे विना क्रमांकाची दुचाकी घेऊन उभा असलेल्या जॉन भोसले याने वसंत पवार साहेबांनी बोलवले असून सुझलॉन कंपनी जवळ नेले. नंतर पवार व जॉन भोसले यांनी त्यांना पुर्वेकडे एक किमी अंतरावर नेले. तेथे २ दुचाकीवर ४ जण आले. त्या सर्वांनी मारहाण सुरू केली. यात २०हजार ५०० रुपये रोख, मोबाइल, सोन्याची अंगठी, चैन, कानातील सोन्याच्या बाळ्या, पॅन कार्ड, वाहन परवाना असा ५५ हजाराचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. या दरम्यान मालेगावच्या त्या दोघांनी पळ काढला. रस्त्यात निजामपूर पोलिसांचे वाहन दिसले. वाहनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना घटना सांगितली. वाहनात पोलीस कर्मचारी कोकणी, शिरसाठ, अहिरे आणि कुंभार होते. त्यांनी तातडीने पाठलाग सुरू केला. दोन जण दुचाकीवरुन जात होते. त्यांचा पाठलाग केला. पेटले गावातील लोकांच्या मदतीने सुझलॉन कंपनीचा मॅनेजर म्हणून आलेला वसंत पवार यास तात्काळ शिताफिने पकडले. त्याचवेळेस त्याच्या सोबत असलेला एक जण मात्र तेथून पळून गेला.
पोलिसांनी पकडलेल्या वसंत पवारची चौकशी केली असता त्याच्याकडून पाच जणांची नावे समोर आली आहेत़ संशयितांमध्ये जॉन संतोष भोसले, प्रदीप मॅनेजर चव्हाण, जानी संतोष भोसले, बालम अशोक भोसले, अजय चतुर पवार (सर्व राहणार जामदे) यांचा समावेश आहे़ या वसंत पवारसह ६ जणांविरुध्द भादंवि कलम ३९५, ३२३, ५०६ प्रमाणे निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित वसंत पवार याच्या चौकशीतून ३ वेगवेगळे गुन्ह्याची उकल होत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली़ त्याच्यासह अन्य जणांच्या चौकशीतून अनेक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़