लुबाडणूक टाळण्यासाठी ग्राहकांनो सजग रहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 10:04 PM2017-08-18T22:04:07+5:302017-08-18T22:04:51+5:30
अरुण देशपांडे यांची पत्रपरिषदेत माहिती : कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचे विक्रेत्यांना निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : ग्राहकांची अडवणूक करून त्यांची लूटमार करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी सरकारचे पारदर्शक धोरण आहे. मात्र, तरीही आभाळ इतके फाटले आहे की त्याला ठिगळ लावणार तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो. तरीही ग्राहकांनी सजग राहून लुबाडणूक करणाºयांच्या विरोधात तक्रार द्यावी, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण वसंतराव देशपांडे (मंत्रीस्तरीय) यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शुक्रवारी दुपारी ही पत्रपरिषद झाली. देशपांडे पुढे म्हणाले, की पूर्वीच्या सरकारच्या काळात ग्राहकांच्या अनेक अडचणींकडे उदासिनतेने पाहिले जात होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वात प्रथम ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून ‘राईट टू सर्व्हिस’ अॅक्ट लागू केला. याअंतर्गत अन्नधान्यांमध्ये होणारी भेसळ, मॉल, दुकानांमध्ये ग्राहकांची होणारी लूटमार व इतर ठिकाणी ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई झाली का नाही? याबाबत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीतर्फे पाठपुरावा केला जातो. तसेच ग्राहक हिताच्या दृष्टीनेही समितीतर्फे शासनाने नेमके काय धोरण ठरविले पाहिजे, याविषयी सूचित केले जाते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरूडे, साहाय्यक पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार अमोल मोरे, अपर तहसीलदार ज्योती देवरे आदी उपस्थित होते.
प्रशासनाची भूमिका महत्त्वाची!
ग्राहक हिताच्या दृष्टीने शासनातर्फे जे काही निर्णय होतात, त्याविषयी माहिती प्रशासनातर्फे सर्वसामान्य नागरिकांना देणे गरजेचे आहे. शासन व ग्राहक यांच्यातील मधला दुवा म्हणजे प्रशासन होय. ग्राहकांना जागरूक करण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही देशपांडे म्हणाले.
ग्राहक जागृती कार्यक्रम राबविणार!
ग्राहक हिताच्या दृष्टीने राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीतर्फे ग्राहक जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींनुसार ग्राहकांना अपेक्षित असलेली सेवा देणे विक्रेत्यांचे कर्तव्य आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.