धरण उशाला, कोरड घशाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 04:10 PM2019-04-10T16:10:15+5:302019-04-10T16:11:03+5:30
ग्रामस्थांची वणवण : म्हसाळे येथे भीषण पाणीटंचाई, पाण्याअभावी नळ पाणी योजना बंद
निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्याच्या पुर्वेला असलेल्या म्हसाळे गावात वाढत्या तापमानाबरोबर भिषण दुष्काळी स्थितीचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र रूप घेत आहे. दोर, बादली घेऊन गाव विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिला, मुलांची झुंबड उडत आहे. गावाची नळ पाणी योजना याअगोदरच पाण्याअभावी पूर्णपणे बंद पडली आहे. गावालगत धरण असूनही उपयोगास परवानगी नाही. त्यामुळे धरण उशाला, कोरड घशाला, अशी ग्रामस्थांची स्थिती झाली आहे.
निजामपूर-लामकानी रस्त्यावर दीड हजार वस्तीचे म्हसाळे गाव आहे. हा पर्जन्यछायेचा भाग गणला जातो. पावसाळ्यात या परिसरात अत्यल्प पाऊस झाला. परिसरातील पाझर तलाव, नदी, नाले पार कोरडे आहेत. त्यामुळे गुरांना पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, अशी समस्या निर्माण झाली आहे. म्हसाळे धरणावर गुरांना पाणी पिण्यासाठी न्यावे लागत आहे.
गावासाठी असलेली नळ पाणी पुरवठा योजना दक्षिणेकडील बापूजी धरणाखालील विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पण त्या विहिरीचे पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे.
गावासाठी एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, ते पाणी नळाद्वारे देणे शक्य नसल्याने ते पाणी आणून गाव विहिरीत टाकण्यात येते. त्यातून दोर बादलीद्वारे महिला, पुरुष पाणी भरून नेतात. इतकाच काय तो गावास आधार आहे. पाणी मिळविण्यासाठी येथे मोठी गर्दी होते.
गावाच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर गारबर्डी धरण आहे. त्याची उंची व लांबी वाढविली तर पावसाळ्यात पाणीसाठा वाढेल. जलसिंचन वाढेल, शिवाय पिण्याचा पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. यासाठी सतत चार वर्षांपासून पाठपुरावा करीत असल्याचे गुलाबराव का. माळी यांनी सांगितले. परंतू उपयोग झालेला नाही.
तीव्र उन्हामुळे भूगर्भातील पाणी संपते आहे. गावालगत असलेल्या धरणाला म्हसाळे धरण नाव दिले आहे. मात्र, या धरणाचा म्हसाळेच्या लोकांसाठी पाणी मिळण्यात यत्किंचितही उपयोग होत नाही. या धरणाखाली विहीर खोदण्यास परवानगी मिळावी म्हणून ३ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ गेले होते. पण त्यांना निराश होऊन परतावे लागले. परवानगी मिळू शकली नाही. सरपंच भागाबाई दिलीप सोनवणे, उपसरपंच रुपाली गुलाब माळी व सदस्यांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नी लवचिक, सकारात्मक धोरण घेण्याची आवश्यकता अपेक्षित केली आहे.
यापूर्वी सन २०१४, २०१७ मध्ये गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता तशी वेळ येऊ नये म्हणून गारबर्डी धरणाची उंची व लांबी वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात पाणीप्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे.