तीन गावांमध्येच झाली नुकसानाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 01:31 PM2019-11-03T13:31:52+5:302019-11-03T13:32:09+5:30
पालकमंत्र्यांचा धावता दौरा । पंचनाम्यांचा अहवाल चार दिवसांत सादर करण्याचे दिले निर्देश
धुळे : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे पंचनामे करून नुकसानाचा अहवाल चार दिवसांत सादर करा, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येथे दिले.
जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे यांनी शनिवारी सकाळी धुळे तालुक्यातील आर्वी, देवभाने, सरवड आदी गावांना भेट देवून नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी.एम. मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर) यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही
महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवून शेतीतील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पीक विमा कंपनी, कृषी विभागाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तो राज्य शासनाला सादर करण्यात येईल. त्यानंतर नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याची सूचना पालकमंत्री भुसे यांनी केली. तसेच भिज पावसामुळे झालेल्या पडझड झालेल्या घरांचा पंचनामा करुन त्याचाही अहवाल सादर करावा. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा.
गुरांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या
याशिवाय पावसामुळे चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत चाºयाचे नियोजन करावे. सततच्या पावसामुळे साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी फवारणी, धुरळणी करावी. जनावरांसाठी लसीकरण मोहीम राबवावी. तसेच शेतकºयांसाठी आलेले अनुदान तत्काळ त्यांच्या बचत खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी बँक अधिकाºयांची आढावा बैठक घ्यावी, असेही निर्देशही मंत्री भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करताना एकही लाभार्थी शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घेण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वय ठेवावा.
नुकसानीची केली पाहणी
तत्पूर्वी भुसे यांनी आर्वी, देवभाने, सरवड परिसराला भेट देत शेतीतील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे, उपविभागीय अधिकारीदराडे, तहसीलदार किशोर कदम, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदी उपस्थित होते.
अपघातग्रस्ताला मदत
पालकमंत्री भुसे आर्वीकडून देवभाने गावाकडे जात असताना त्यांना नगावबारीजवळ अपघातग्रस्त व्यक्ती दिसला. त्यांनी वाहन थांबवून अपघातग्रस्त व्यक्तीसोबत असलेल्या नातेवाईकांकडे चौकशी केली. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या वाहनातून तातडीने अपघातग्रस्त व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात पाठविले. जिल्हा शल्यचिकित्सकांशी मोबाईलवरुन संपर्क साधून अपघातग्रस्त व्यक्तीवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.