रेशन दुकानात पाणी शिरल्याने गहू, तांदूळ, डाळीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:50 PM2020-07-28T21:50:34+5:302020-07-28T21:50:58+5:30
दुकान क्रमांक ४० : धान्य वितरीत करण्याचे पुरवठा विभागाचे आदेश
धुळे : येथील एका रेशन दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने गहू, तांदूळ, डाळ आदी धान्याचे नुकसान झाले आहे़
शहरातील लोहार गल्लीत असलेल्या एका व्यापारी संकुलाच्या तळमजल्यातील गाळ्यांमध्ये स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४० आहे़ सदर व्यापारी संकुलाचे मालक मोरे यांच्या पत्नीच्या नावावर या दुकानाचा परवाना आहे़ २४ जुलै रोजी रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे व्यापारी संकुलाच्या तळ मजल्यातील दुकानांमध्ये पाणी शिरले़
रेशन दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील धान्य पाण्यात भिजले़ त्यात सात किलो तांदूळ, सात किलो गहू, आणि २० किलो डाळीचे नुकसान झाले आहे़ दुकान मालकाने दुसऱ्या दिवशी व्यापारी संकुलाच्या छतावर सदर धान्य उन्हात सुकविण्यासाठी ठेवले होते़
दरम्यान, दुकान मालकाने दिलेल्या माहितीवरुन शहर पुरवठा निरीक्षक हर्षा महाजन, पुरवठा निरीक्षण अधिकारी सी़ एस़ चौधरी यांनी नुकसानाची पाहणी करुन पंचनामा केला़ याबाबतचा अहवाल त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांच्याकडे सादर केला आहे़
पावसाच्या पाण्यात धान्याचे नुकसान झाले असले तरी धान्यसाठा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी दुकानदाराची होती़ पावसाळा असुन देखील त्यांनी दक्षता घेतली नाही़ त्यामुळे दुकानदाराने बाजारातून धान्य विकत घेवून शिधापत्रिकाधारकांना त्वरीत वितरीत वितरीत करावे, असे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत, अशी माहिती सी़ एस़ चौधरी यांनी दिली़
दुकानदाराने दोन दिवसाच्या आत लाभार्थ्यांना धान्य वितरीत केले नाही कारवाई केली जाईल, असे चौधरी यांनी सांगितले़