बुराई नदीपात्रातील डांगरवाड्या उध्द्वस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:20 PM2020-04-24T22:20:27+5:302020-04-24T22:20:56+5:30
चिमठाणे शिवार : भोई समाजावर आली उपासमारीची वेळ, दखल घेण्याची मागणी
चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणेनजिक बुराई नदी पात्रामधील डांगर वाड्या उध्द्वस्त झालेल्या आहेत़ त्यात लावलेला खर्च देखील निघाला नसल्याने भोई समाजावर उपासमारीचा कटू प्रसंग ओढवलेला आहे़ शासनाने यांची दखल घेऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी भोई समाजाच्यावतीने करण्यात आलेली आहे़
चिमठाणे गावाजवळ वाडी धरण असून या धरणातील पाणी हे बुराई नदीपात्रांमध्ये येत असते़ बुराई नदी मध्ये यावर्षी भोई समाजाने मोठ्या प्रमाणात खर्च करुन डांगर वाड्या लावल्या होत्या. परंतु दुदैर्वाने तोेंडाजवळचा घास हिरावून घेतला. या वर्षी पाऊस समाधान कारक झाल्याने बुराई पात्रंमध्ये डांगर, टरबूज, काकडी, गिलके, दोडके, खिरे असे विविध प्रकारचे फळ लावली होती. सुरुवातीला सुंदर अश्या प्रकारे मळा बहरला होतो. पाणी देखील मुबलक होते तसेच काही प्रमाणत फळ निघायला लागली. त्यानंतर पाणी कमी कमी होत गेल्याने झाडाची फांद्या कोमजून गेल्या़ परंतु कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर या थोडा फार प्रमाणात आलेल्या काकड्या, डांगर, टरबूज यावर देखील परिणाम दिसून आला. जे फळ निघाले त्याला कोणीच घेत नव्हते़ दुसरीकडे विक्री करता येतं नव्हती़ त्याला भाव नसल्याने शेवटी कवडीमोल किंमत मोजावी लागली आणि पहिली व दुसरी तोडणी करून त्या बुराई नदी मधील डांगर वाड्यात गुरांना चारून देण्यात आले. असा प्रकार चिमठाणे बुराई नदी मधील लावलेल्या डांगर वाड्यात झाला.
२० ते २५ वर्षे नंतर प्रथमत: बुराई नदी मध्ये डांगर मळा लावण्यात आला़ चिमठाणे येथील डांगर खूप प्रसिद्ध होते़ मुंबई पुणे नाशिक पूर्ण महाराष्ट्र मध्ये फेमस होते. आजवरच्या काळात असं कधीच झाले नाही़ परंतु यावर्षी अनेकानेक समस्यांना भोई समाजाने तोंड देऊन हातातोंडाशी आलेला घास गेला़ लाखो रुपये खर्च करुन हातात एक रुपया शिल्लक उरला नाही अशी भयंकर आणि वाईट अवस्था पाहून भोई समाजवार झालेला हा अन्याय भरून निघेल का असा प्रश्न उध्दभवत आहे़
अगोदरच बुराई नदी मध्ये वाळू माफियाचा राज होता़ त्यांनी तिथे आपला वाळूचा धंदा चालू केला होता़ तो जेमतेम बंद झाला़ त्यानंतर हे संकट चिमठाणे परिसर मध्ये पाहायला मिळत आहे़ एवढी मेहनत करुन भोई समाजाने एक जुटीने आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पोटाची खळगी भरेल या आशेवर डांगर मळा लावला़ परंतु पदरी निराशा आली़ आता भोई समाजावर एक प्रकारे उपासमारीची वेळ आली असून यांवर प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ त्यांची भरपाई द्यावी अशी मागणी भोई समाजाने केली आहे़