शेती खातेफोडअभावी अपात्रतेचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:13 PM2019-02-15T22:13:59+5:302019-02-15T22:14:43+5:30
शेतकरी सैरभैर : पंतप्रधान शेतकरी योजनेंतर्गत सरकारनेच तोडगा काढण्याची मागणी
साक्री : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यात नव्हे तर राज्यात अनेक शेतकऱ्यांची जमिनीची अद्याप खाते फोड झालेली नाही. त्यामुळे कुटुंब जरी विभक्त असले तरी शेती मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर असल्याकारणाने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकºयांना कायमस्वरूपी आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकºयांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकºयांना दर वर्षी सहा हजार रुपये इतका निधी मिळणार आहे यासाठी तालुक्यातील महसूल स्तरावर शेतकºयांची माहिती जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी पात्र शेतकºयांची यादी प्रसिद्धही करण्यात आली आहे.
परंतु अनेक गावांमध्ये पूर्वापार शेतकºयांच्या जमिनीची खातेफोड न झाल्याने किंवा अतिशय किचकट प्रकरण असल्याकारणाने अनेक शेतकरी खातेफोड करण्यापासून लांबच राहिले आहेत. तर काही शेतकºयांच्या आजोबा-पणजोबांच्या नावावर आजही जमिनी आहेत. कुटुंबाचा प्रचंड विस्तार झालेला असून कुटुंबातील अनेक सदस्य मयत झाले आहेत. त्यामुळे खातेफोड करण्यास शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
मोठ्या कुटुंबांमध्ये कौटुंबिक सदस्यांमध्येच मतभेद असल्याकारणाने शेतजमिनीची खाते फोड होऊ शकत नाही किंवा अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या नावावरच शेत जमिनी आहेत. यामुळे सातबारा उताºयावर जमिनीचे प्रमाण दोन हेक्टरपेक्षा अधिक असल्याने शेतकºयांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही शेतकºयांच्या वाट्यास एक एकर पेक्षाही कमी जमीन आहे. परंतु त्याच्या सातबाºयावर कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे लागलेली आहेत. भावा-भावांची तोंडी वाटणी झाल्यावरही सातबारा उताºयावर मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर जमीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकरीही सैरभैर झालेले आहेत यासाठी शासनाने योग्य तो पर्याय काढून अशा वंचित शेतकºयांनाही लाभ मिळायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ज्या शेतकºयांच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असेल आणि त्यात त्याच्या इतर भावांचाही वाटा असेल अशा शेतकºयांची व जमिनीची फोड करून त्यांनाही लाभ देण्यात यावा, त्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे