चंद्रपुरच्या पोलिसांना दिनू डॉनचा हिसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:20 PM2017-08-20T23:20:12+5:302017-08-20T23:24:13+5:30
शिरुडची घटना : पोलिसांचा शोध जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चंद्रपूर येथे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी दिनू डॉन उर्फ दिनेश गायकवाड याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना हिसका दाखवत तो पळून जाण्यात यशस्वी ठरला़ ही घटना रविवारी सकाळी धुळे तालुक्यातील शिरुड गावात घडली़ दरम्यान, रात्री यासंदर्भात तालुका पोलीस स्टेशनला दिनू डॉनसह चार जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करुन पळून गेल्याची फिर्याद चंद्रपूर पोलिसांनी दाखल केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंप्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ त्या गुन्ह्यात दारु पुरविण्याबाबत धुळे जिल्ह्यातील मद्यसम्राट दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन याचे नाव समोर येत आहे़ त्यामुळे संशयित दिनेश गायकवाड याला ताब्यात घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंप्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्यासह पोलिसांचे पथक रविवारी धुळ्यात दाखल झाले़ पथक रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील शिरुड गावात पोहचले़ त्याठिकाणी दिनेश गायकवाडची चौकशी करत असताना त्याच्यासह प्रवीण निंबा गायकवाड, बंडू निंबा गायकवाड आणि सोपान परदेशी (सर्व रा़ शिरुड ता़ धुळे) यांनी पोलिसांशी हुज्जत घातली़ त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न केला़ शासकीय कामात अडथळा आणून तेथून पळ काढला.
या घटनेनंतर धुळे तालुका पोलीस ठाण्यात पथक दाखल झाले़ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे यांनी चौघांविरुध्द फिर्याद दिली़ त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघाविरुध्द गुन्हा दाखल झाला़ पथकाने धुळे तालुका पोलिसांची मदत घेवून पुन्हा शिरुड गाव गाठले होते़ परंतु तो पर्यंत हे चौघेही गावातून पसार झाल्याने त्यांच्या हाती आले नाही.