झोक्यातून पडून बालिकेचा, तर झोपेत बालकाचा मृत्यू; धुळे व शिरपूर तालुक्यातील वेगवेगळ्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:13 PM2023-05-10T17:13:51+5:302023-05-10T17:14:05+5:30
धुळे तालुक्यातील वरखेडी येथे खालची भिलाटी भागात राहणारे जितू सोनवणे यांची सहा महिन्याची मुलगी परी जितू सोनवणे घरात झोक्यामध्ये झोपली होती.
राजेंद्र शर्मा
धुळे: झोक्यातून पडल्याने वरखेडी (ता. धुळे) येथे सहा महिन्याच्या बालिकेचा तर शिरपूर शहरात झोपेतच सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.धुळे तालुक्यातील वरखेडी येथे खालची भिलाटी भागात राहणारे जितू सोनवणे यांची सहा महिन्याची मुलगी परी जितू सोनवणे घरात झोक्यामध्ये झोपली होती. झोक्याची दोरी तुटल्याने, तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची घटना ८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. तिला खासगी वाहनाने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, डॅा. दिव्या गवळी यांनी बालिकेला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेड कॅान्स्टेबल देवरे करीत आहे.
बालकाचा झोपेतच मृत्यू
शिरपूर शहरातील क्रांतीनगरातील ६ महिन्याचा बालक काहीच हालचाल करीत नसल्यामुळे त्यास अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सुदर्शन रमेश सोनार (वय ६ महिने) हा बालक घरातील पलंगावर झोपलेला असतांना त्याचे वडील रमेश सोनार हे त्यास पाहण्यासाठी गेले असता तो काहीएक हालचाल करीत नव्हता. त्यामुळे त्यांनी लागलीच बालकाला इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला दाखल केले, तेथून येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ़ अमोल जैन यांनी तपासून मृत घोषित केले़ याबाबत शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे.