चलन तपासणीमुळे अंदाजपत्रक लांबणीवर!
By admin | Published: January 18, 2017 12:11 AM2017-01-18T00:11:13+5:302017-01-18T00:11:13+5:30
चलने तपासण्यास होत असलेल्या विलंबामुळे अंदाजपत्रक लांबणीवर पडत आह़े
धुळे : सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनपात नागरिकांनी कर भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या़ परिणामी मनपात 15 दिवसातच 15 कोटी रुपयांचा विक्रमी कर भरणा झाला़ मात्र सदर भरण्याच्या रकमेची चलने तपासण्यास होत असलेल्या विलंबामुळे अंदाजपत्रक लांबणीवर पडत आह़े त्यामुळे लेखा विभागाकडून सर्व विभागांना वारंवार स्मरणपत्रे दिली जात आहेत़
सरकारने 8 नोव्हेंबरला हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली़ त्यानंतर लागलीच स्थानिक स्वराज्य संस्थांना जुन्या हजार व पाचशेच्या नोटांच्या माध्यमातून कर भरणा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती़ त्यानंतर या संधीचा लाभ घेण्यासाठी मनपा प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करीत अवघी यंत्रणा करवसुलीच्या कामास लावण्यात आली होती़ त्यामुळे धुळे मनपाने राज्यातील ड वर्ग महापालिकांमध्ये अव्वल क्रमांक मिळविला होता़ मात्र 15 कोटींच्या करवसुलीनंतर वसुली विभागाकडून नागरिकांनी भरलेल्या चलनांची तपासणी सुरू करण्यात आली आह़े जवळपास 30 हजार चलनांच्या माध्यमातून 15 कोटींचा कर भरणा झाला आह़े
वसुली विभागाकडून चलन तपासणीचे काम सुरू असून प्रत्येक मालमत्ताधारकाला आकारलेला कर, त्याच्याकडे असलेली थकबाकी, भरण्यात आलेली रक्कम, धनादेश व चलनांद्वारे संकलित झालेली रक्कम यासारख्या बाबी तपासून त्यांच्या संगणकीकृत नोंदी केल्या जात आहेत़ त्यामुळे या कामास आणखी कालावधी लागू शकतो़ तर दुसरीकडे लेखा विभागाला सुधारित व पुढील वर्षाचे नियमित अंदाजपत्रक तयार करावयाचे असल्याने संबंधित विभागाने सर्व विभागांना पत्रे देऊन जमा व खर्चाचा ताळमेळ मागविला आह़े लेखा विभागाने सर्व विभागांना स्मरणपत्रेदेखील दिली असून काही विभागांनी जमा-खर्चाची आकडेवारी लेखा विभागाला सादर केली आह़े मात्र वसुली विभागात चलन तपासणी सुरू असल्यामुळे जमा रक्कम व खर्चाचा ताळमेळ बसू शकलेला नाही़ काही चलनांचा ताळमेळ बसत नसल्याने प्रक्रिया लांबत असून त्यामुळे अंदाजपत्रकदेखील लांबणीवर पडत आह़े गेल्या वर्षीही अंदाजपत्रकाला विलंब झाला होता़ त्यामुळे मार्च महिन्यात सुधारित व मे महिन्यात नवीन अंदाजपत्रक मंजूर झाले होत़े यंदाही चलन तपासणीचे काम लवकर मार्गी न लागल्यास अंदाजपत्रक लांबणीवर पडू शकत़े लेखा विभागाचे उपमुख्य लेखापरीक्षक माधव सराई यांची बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आह़े