६२ हजार हेक्टरसाठी ४३ कोटींच्या अनुदानाची शासनाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:03 PM2019-11-13T22:03:45+5:302019-11-13T22:11:08+5:30
शिंदखेडा तालुक्यात पंचनामे पूर्ण : ९६ हजार शेतकऱ्यांचे ८० हजार हेक्टरवरील पीक बाधित
शिंदखेडा : तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ९६ हजार शेतकऱ्यांचे ८० हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. ६२ हजार हेक्टरसाठी ४३ कोटी रुपये अनुदानाची शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे.
शिंदखेडा तालुक्यात परतीच्या सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी पंचनामे पूर्ण केले असून त्यात ९६ हजार ४४९ शेतकºयांच्या ८० हजार १०३.०२ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात ८० हजार ८९ शेतकºयांनी ६२ हजार ८६९.२१ हेक्टरवरील पीक विमा काढलेला नसल्याने त्यासाठी शासनाकडे ४३ कोटी २२ लाख ५८ हजार ४७ रुपये अनुदानाची मागणी शिंदखेडा तहसील कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तालुक्यात फक्त १६ हजार ३६० शेतकºयांनीच १७ हजार २३३.८१ हेक्टरवर पीक विमा काढलेला होता.
शिंदखेडा तालुक्यातील १० मंडळात परतीच्या सततच्या पावसाने सर्वच पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. अजूनही शेतातील पिकात पाणी असून काही पिके सडून गेली आहेत. त्यात शासनाकडून ८ तारखेपर्यंत पंचनामे करण्यास सांगण्यात आले होते. ते सर्व पंचनामे मुदतीत पूर्ण करण्यात आले आहेत. त्यात ३३ टक्केच्या वर नुकसान झालेले ज्वारी २ हजार २५९.२१ हेक्टर, बाजरी ७ हजार ७६३.८८ हेक्टर, मका ५ हजार ४५३.१७ हेक्टर, भुईमूग १ हजार ५२४.७६ हेक्टर, सोयाबीन ३५.४० हेक्टर, कापूस ६१ हजार ५१७.३९ हेक्टर, भाजीपाला ७ हजार ७०.७४ हेक्टर, इतर पिके ७ हजार ७८.४७ असे एकूण ९६ हजार ४४९ शेतकºयांचे ८० हजार १०३.०२ हेक्टरवरील पिके सततच्या पावसाने बाधित झाली आहेत. पैकी त्यात १६ हजार ३६० शेतकºयानी १७ हजार २३३.८१ हेक्टरचा पीक विमा काढला आहे. उर्वरित ८० हजार ८९ शेतकºयांनी ६२ हजार ८६९.२१ हेक्टरवर पीक विमा काढलेला नसल्याने अशा शेतकºयांसाठी जिरायती पिके त्यात कापूस ४७ हजार ६५७.८३ हेक्टर, मका ४ हजार १८१.६५ हेक्टर, ज्वारी १ हजार ८८५.४२ हेक्टर, बाजरी ६ हजार ६९४.८१ हेक्टर, भुईमूग ९४० हेक्टर, सोयाबीन २२.१० हेक्टर, व इतर पिके ७ हजार ७८.४७ हेक्टर असे एकूण ६२ हजार १६०.६४ हेक्टरसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयेप्रमाणे ४२ कोटी २६ लाख ९२ हजार ३५२ रुपयांचे तसेच बागायती पिकात कांदा ७०८.५७ हेक्टरवरील हेक्टरी १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ९५ लाख ६५ हजार ६९५ असे एकूण ४३ कोटी २२ लाख ५८ हजार ४७ रुपये ६२ हजार ८६९.२१ हेक्टर या क्षेत्रासाठी अनुदान मागणी शिंदखेडा तहसीलकडून शासनास करण्यात आली आहे.
यात सदर अनुदान हे पीक विमाक्षेत्र वगळून करण्यात आलेले आहे.